Jeffrey Epstein DNA | जेफ्री एपस्टिनला आपल्या डीएनएद्वारे वाढवायचा होता त्याचा सुपर मानवी वंश 
आंतरराष्ट्रीय

Jeffrey Epstein DNA | जेफ्री एपस्टिनला आपल्या डीएनएद्वारे वाढवायचा होता त्याचा सुपर मानवी वंश

पुढारी वृत्तसेवा

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप असणारा लैंगिक गुन्हेगार जेफ्री ई. एपस्टिन याचे एक विचित्र स्वप्न होते. न्यू मेक्सिकोमधील आपल्या प्रचंड रांचवर एकाच वेळी 20 महिलांना गर्भवती करून आपल्या डीएनएद्वारे मानवी वंश पेरण्याची त्याची इच्छा होती. त्याद्वारे त्याला ‘सुपर ह्युमन रेस’ तयार करावयाची होती.

एपस्टिनच्या विचारसरणीची माहिती असणार्‍या चार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अनेक वैज्ञानिक व इतर लोकांशी या योजनेबाबत मोकळेपणाने चर्चा केली होती. मात्र, ही योजना प्रत्यक्षात कधी अमलात आली की नाही, याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या या खळबळजनक वृत्तात त्याचे सर्व तपशील प्रसिद्ध करण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षांत एपस्टिनने हार्वर्डशी संबंधित असलेल्या अनेक नामवंत वैज्ञानिकांसह अनेक प्रभावी शास्त्रज्ञांचे वलय आपल्याभोवती निर्माण केले होते. एपस्टिनची ही कल्पना ‘ट्रान्सह्युमॅनिझम’ या संकल्पनेशी संबंधित होती. म्हणजेच जनुकीय अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवजातीला सुधारणे. या संकल्पनेची तुलना अनेक टीकाकारांनी आधुनिक युजेनिक्सशी केली आहे. युजेनिक्स ही नियंत्रित प्रजननाद्वारे मानवी वंश सुधारण्याची, आता बदनाम ठरलेली संकल्पना आहे.

14 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली अटक झालेला एपस्टिन हा सातत्याने आपले नेटवर्क वाढवून याद्वारे जगातील अनेक बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींनाही आकर्षित करत होता. त्याने आपल्या ग्राहकांच्या ओळखीबाबत, आपली संपत्ती, आर्थिक कौशल्ये आणि वैयक्तिक यशाबाबत खोटे दावे केले. मात्र, आपल्या ओळखी आणि करिष्म्याच्या जोरावर त्याने व्यावसायिक व राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध निर्माण केले.

काही वैज्ञानिकांसाठी मुख्य आकर्षण म्हणजे एपस्टिनकडून मिळणारे त्याचे अफाट पैसे. त्याने त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांसाठी निधी देण्याचे आमिष दाखवले. काहींनी या निधीच्या शक्यतेमुळे त्याच्या लैंगिक गुन्ह्यांची गंभीरता त्यांच्या लक्षात आली नाही, हे त्यापैकी काहींनी मान्य केले. त्यामुळे त्याच्या अर्धवट वैज्ञानिक कल्पनांनाही त्यांनी गांभीर्याने घेतले.

2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून एपस्टिनने अनेक वैज्ञानिक आणि उद्योगपतींना सांगितले होते की, न्यू मेक्सिकोतील आपल्या रांचवर महिलांना आपल्या वीर्याद्वारे गर्भवती करून मुले जन्माला घालण्याचा त्याचा मानस आहे. ही कल्पना तिघांनाही अस्वस्थ करणारी आणि अतर्क्य वाटली. मात्र ती बेकायदेशीर ठरेल, हे मात्र स्पष्ट झालेले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT