toll pudhari
आंतरराष्ट्रीय

Japan Toll System Crash | द्रुतगती मार्गावरील 106 टोल नाक्यांवरील यंत्रणा 38 तास ठप्प; पण जपानी नागरिक कित्ती प्रामाणिक... वाचा काय घडलं?

Japan Toll System Crash | जगभरातून होत आहे जपानी नागरीकांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव

Akshay Nirmale

Japan Toll System Crash japnese civic sense

टोकियो: जपान म्हटलं की डोळ्यासमोर येते ती शिस्तप्रिय आणि प्रामाणिक माणसं. नियमांचे काटेकोर पालन आणि सामाजिक जबाबदारीची खोलवर रुजलेली भावना हे जपानच्या नागरिकांचे वैशिष्ट्य मानले जाते.

याच वैशिष्ट्याचे एक अनोखे आणि हृदयस्पर्शी उदाहरण नुकतेच जगासमोर आले आहे. देशातील सर्वात व्यस्त द्रुतगती मार्गांवरील टोल वसुलीची इलेक्ट्रॉनिक प्रणाली तब्बल 38 तास ठप्प झाली होती.

अशा परिस्थितीत प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व टोलनाके खुले केले आणि वाहनांना विना थांबा जाऊ दिले. मात्र, या 'मोफत प्रवासा'ची संधी न साधता, तब्बल 24000 नागरिकांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत स्वतःहून टोल भरला.

नेमकं काय घडलं?

'जपान टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना या वर्षी 8 आणि 9 एप्रिल रोजी घडली. सेंट्रल निप्पॉन एक्सप्रेसवे कंपनी (NEXCO Central) द्वारे संचालित केल्या जाणाऱ्या टोमेई आणि चुओ या प्रमुख द्रुतगती मार्गांवरील इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) सिस्टीममध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला.

जपानमध्ये वाहने टोलनाक्यावर किंचित हळू झाल्यावर सेन्सरद्वारे कार्ड वाचले जाते आणि गेट आपोआप उघडते.

मात्र, या बिघाडामुळे तब्बल 106 टोलनाक्यांवर वाहनांमधील ईटीसी कार्ड स्कॅन करणे अशक्य झाले. याचा परिणाम टोकियो, कानागावा, यामानाशी, नागानो, शिझुओका, आयची, गिफू या प्रमुख भागांतील वाहतुकीवर झाला.

प्रशासनाचा निर्णय आणि नागरिकांचा प्रतिसाद

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिस्टीम बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता होती. हे संकट टाळण्यासाठी NEXCO Central ने एक धाडसी पण महत्त्वाचा निर्णय घेतला.

त्यांनी सर्व बाधित टोलनाक्यांचे गेट उघडून वाहनांना विनाशुल्क पुढे जाण्याची परवानगी दिली. तसेच, नागरिकांना नंतर ऑनलाइन पद्धतीने टोल भरण्याचे आवाहन केले.

अशा परिस्थितीत अनेकजण विनाशुल्क प्रवासाचा आनंद घेतील, पण जपानच्या नागरिकांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. 8 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपर्यंतच सुमारे 24000 लोकांनी कंपनीशी संपर्क साधून टोल भरण्याची इच्छा व्यक्त केली. सिस्टीम बंद असताना अंदाजे 9,20,000 ईटीसी-सुविधा असलेल्या गाड्या या मार्गांवरून प्रवास करत होत्या, असे कंपनीने सांगितले.

कंपनीचा कौतुकास्पद निर्णय आणि परतावा

नागरिकांचा हा प्रामाणिकपणा पाहून कंपनीनेही मोठे मन दाखवले. मे महिन्यात NEXCO Central ने घोषणा केली की, सिस्टीम बंद असलेल्या कालावधीत बाधित भागातून प्रवास केलेल्या सर्व वाहनांचा टोल माफ करण्यात येत आहे.

इतकेच नाही, तर ज्या प्रामाणिक नागरिकांनी आधीच टोल भरला होता, त्यांना ईटीसी मायलेज प्रोग्राम किंवा इतर मार्गांनी संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

ही बातमी समोर येताच जगभरातील सोशल मीडियावर जपानच्या नागरिकांच्या नागरिक कर्तव्याचे (civic duty) आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे तोंडभरून कौतुक होत आहे. एका वापरकर्त्याने म्हटले, "जपान हा एकमेकांवर प्रचंड विश्वास ठेवणारा समाज आहे." तर दुसऱ्याने लिहिले, "जर जपानसारख्या सुविधा मिळत असतील, तर मी सुद्धा आनंदाने पैसे भरेन."

ही घटना केवळ एका तांत्रिक बिघाडाची कहाणी नसून, ती एका देशाच्या सामाजिक मूल्यांचे, नागरिकांच्या प्रामाणिकपणाचे आणि प्रशासन व जनता यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे उत्तम उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT