टोकियो : जपानने पुन्हा एकदा आपल्या अफाट तांत्रिक क्षमतेने जगाला चकित केले आहे. ओसाका येथील सायन्स कंपनीने ‘मिराई निनगेन सेंताकुकी’ नावाची ‘मानवी वॉशिंग मशिन’ सादर केली आहे. हे एआय तंत्रज्ञानावर आधारित शॉवर कॅप्सूल केवळ 15 मिनिटांत माणसाला अंघोळ घालून, शरीर सुकवून पूर्णपणे ताजेतवाने करते.
या पारदर्शक कॅप्सूलमध्ये बसल्यावर, हायस्पीड वॉटर जेटस् आणि सूक्ष्म बुडबुड्यांच्या (मायक्रोबबल्स) साहाय्याने त्वचेची सखोल स्वच्छता केली जाते. हे बुडबुडे फुटल्यावर निर्माण होणार्या दाब-लहरींमुळे त्वचेतील घाण बाहेर फेकली जाते. यासाठी कोणत्याही रसायनांची गरज नाही.
यात बसवलेले सेन्सर्स हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान मोजतात, ज्याच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाण्याचे तापमान नियंत्रित करते. वापरकर्त्याच्या मनःस्थितीनुसार समुद्राच्या लाटांचे व्हिडीओ किंवा शांत संगीत दाखवून मानसिक आरामही दिला जातो. हे उपकरण केवळ शारीरिक स्वच्छता न करता मानसिक आरोग्याचाही विचार करते.