पुढारी ऑनलाईन :
फुटबॉल जगतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमैका मध्ये एका मैत्रिपूर्ण फुटबॉल सामन्यात एक दु:खद घटना घडली आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या गोळीबारात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. या विषयी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. मात्र या घटनेत नेमके किती लोक जखमी झाले आहेत या विषयी माहिती समोर आलेली नाही. जमैकाची राजधानी किंग्स्टनमध्ये हा सामना सुरू होता. (Football Match)
हा गोळीबार सोमवारी रात्री राजधानी किंग्स्टन मध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान झाला. पोलीस गोळीबाराच्या घटनेचा तपास करत आहेत. जमैकाच्या ग्लीनर वृत्तपत्राच्या माहितीनुसार हा फुटबॉल सामना प्लेजेंट हाइट्स येथे आयोजित करण्यात आला होता.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीसांनी या परिसरात ४८ तासांची संचारबंदी लागू केली आहे. गोळीबार कोणत्या कारणातून झाला याची माहिती पोलीसांकडून सांगण्यात आलेली नाही. ग्लीनरच्या रिपोर्टनुसार किंग्स्टनचे पोलीस अधिकारी टॉमली चेम्बर्स यांनी सांगितले की, गोळीबार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाला. जखमी लोकांची संख्या समोर आलेली नाही. गंभीर जखमी लोकांना रूग्णालयात नेण्यात आले. यामध्ये कोणत्या गँगवारचा संबंध नाही ना याची माहिती घेतली जात आहे.