पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेकदा वादग्रस्त विधान करणारे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जोरदार टीका केली आहे. जॉर्ज सोरोस हे लोकशाहीसाठी धोका आहेत, ते इतर देशांच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप करतात आणि त्यांच्या पैशाच्या बळाचा वापर करून राष्ट्रांना अस्थिर करण्याचे काम करतात, असा हल्लाबोल मेलोनी यांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलच्या राजदूतांनी जॉर्ज सोरोस यांच्यावर हमास समर्थक संघटनांना आर्थिक मदत केल्याबद्दल टीका केली होती. यानंतर 'एक्स'चे मालक आणि अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी जॉर्ज सोरोस यांच्या मानवतेबद्दलच्या द्वेषात इस्रायलचाही समावेश असल्याचे म्हटले होते. तसेच 'एक्स'वर मस्क यांनी हमास समर्थक एनजीओंना १५ दशलक्ष डॉलर्सची मदत दिल्याचा अहवाल शेअर केला होता.
इटालियन पत्रकारांनी पंतप्रधान मेलोनी यांना विचारले की एलॉन मस्क युरोपियन राजकारणात हस्तक्षेप करत आहेत का? यावर मेलोनी म्हणल्या की, एलॉन मस्क फक्त त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत आहेत. जॉर्ज सोरोस हे लोकशाहीसाठी धोका आहेत. ते इतर देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करतात आणि त्यांच्या पैशाच्या बळाचा वापर करून राष्ट्रांना अस्थिर करण्याचे काम करतात, मात्र मस्क तसे करत नाहीत.
गेल्या वर्षी सोरोस यांनी अदानी मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. या मुद्द्यावरून भारतात लोकशाही बदल होईल असा दावा केला होता. २०२० मध्ये सोरोस यांनी कलम ३७० हटवल्यानंतरही मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले होते. भारत एक लोकशाही देश आहे, पण नरेंद्र मोदी लोकशाहीवादी नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.