Italy Ban Burqa-Niqab in Schools Pudhari
आंतरराष्ट्रीय

Italy Ban Burqa-Niqab in Schools: जॉर्जिया मेलोनींचा मोठा निर्णय! शाळांमध्ये बुरखा-नकाबवर बंदी; परदेशी विद्यार्थ्यांसाठीही नवा नियम

Italy Ban Burqa-Niqab in Schools: इटली सरकारने शाळांमध्ये बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी घालणारा नवा शिक्षण कायदा मंजूर केला आहे.

Rahul Shelke

Italy Ban Burqa-Niqab in Schools: इटलीने शिक्षण क्षेत्रात मोठे बदल केले आहेत. देशातील शाळांमध्ये बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी घालण्यासोबतच वर्गातील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे इटलीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी सरकारवर भेदभावाचा आरोप केला आहे.

इटलीच्या कनिष्ठ सभागृहात या शिक्षण सुधारणेच्या बाजूने 142 मते पडली, तर 112 खासदारांनी विरोध केला. चार खासदार तटस्थ राहिले. यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी सिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. आता या कायद्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोशाखापासून ते परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशापर्यंत अनेक बदल होणार आहेत.

काय आहेत नव्या नियमांमधील तरतुदी?

नव्या कायद्यानुसार इटलीतील शाळांमध्ये मुस्लिम मुलींना बुरखा आणि नकाब घालून वर्गात प्रवेश करता येणार नाही. बुरख्यामध्ये संपूर्ण शरीर आणि चेहरा झाकलेला असतो, तर नकाबमध्ये चेहरा झाकला जातो आणि केवळ डोळे दिसतात.

याशिवाय, शाळांमध्ये परदेशी मूळ असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना इटालियन भाषा चांगल्या प्रकारे अवगत आहे, त्यांना या मर्यादेतून सूट मिळणार आहे.

परदेशी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीही सरकारने विशेष तरतूद केली आहे. ज्या मुलांना इटलीच्या शिक्षण व्यवस्थेत सामावून घेण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या पालकांना इटालियन भाषा शिकण्यासाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मेलोनी सरकारच्या निर्णयाला विरोध

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यापूर्वीच अशा प्रकारच्या कायद्याचे संकेत दिले होते. इटालियन शाळांमध्ये स्थानिक मुलांनाच अल्पसंख्याक असल्यासारखे वाटू नये, असे त्यांनी म्हटले होते.

मात्र, विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. मतदानादरम्यान विरोधी खासदारांनी सभागृहात 'शाळेत कोणीही परदेशी नसतो' असा फलक दाखवून सरकारचा निषेध केला.

युरोपमध्येही वाढत आहेत निर्बंध

इटलीचा हा निर्णय युरोपमधील वाढत्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. फ्रान्स आणि बेल्जियममध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर देशव्यापी बंदी आहे. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंडमध्येही वेगवेगळे निर्बंध लागू आहेत.

दरम्यान, पुढील वर्षी इटलीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे स्थलांतरितांचा प्रश्न आणि त्यांच्या एकात्मतेचा मुद्दा पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मेलोनी सरकारच्या या नव्या निर्णयामुळे इटलीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT