तेल अविव (इस्त्राईल) : पुढारी ऑनलाईन
इस्त्राईलचे बेरेशीट अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अयशस्वी ठरले आहे. या यानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला होता. मात्र ते पृष्ठभागावर उतरू शकले नाही. इस्त्राईलने पहिल्यांदाच खासगी आर्थिक बळावर ही मोहिम राबवली होती.
बेरेशीटची निर्मिती SpaceIL आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रिजने केली आहे. ही मोहिम यशस्वी झाली असती तर चंद्रावर सुरक्षितपणे यान उतरविणारा इस्त्राईल हा सोव्हियत युनियन, अमेरिका आणि चीननंतर चौथा देश बनला असता. जेव्हा हे यान चंद्रावरील पृष्ठभागावर उतरणार होते; त्यावेळी अंतिम क्षणी तांत्रिक बिघाडामुळे या यानाशी संपर्क तुटला. यामुळे हे यान पृष्ठाभागावर उतरू शकले नाही. ज्यावेळी या यानाशी संपर्क तुटला त्यावेळी तेल अविव येथील यानावर नियंत्रण ठेवून असलेल्या SpaceILच्या कंट्रोल रुममधील शास्त्रज्ञांची घालमेल वाढली होती.
"चंद्रावर यान उतरविणारा चौथा देश आम्ही बनू शकलो नाही. आम्ही चंद्राच्या जवळ पोहचलो पण यान उतरविण्यास अयशस्वी ठरलो. आम्ही पुन्हा तपासणी करून नेमकी कशामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत", असे कंट्रोल रुमने म्हटले आहे.
बेरेशीटचे प्रक्षेपण २२ फेब्रुवारी राजी करण्यात आले होते आणि या यानाने ४ एप्रिल रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. हे यान चंद्रावरील चुंबकीय क्षेत्र मोजणार होते. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे यानाच्या हालचालीवर कंट्रोल रुममधून लक्ष ठेवून होते. आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्याचा पुन्हा प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले आहे.
इस्त्राईल चंद्रावर पाय ठेवेल, असे आश्वासन नेतान्याहू यांनी याआधी दिले होते.