पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर तब्बल १५ महिन्यानंतर इस्रायल-हमास युद्धबंदी करारावर दोन्ही बाजूंनी सहमती झाल्याचे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अद्याप युद्धबंदी कराराला सहमती दर्शवलेली नाही. युद्धबंदी करार अद्याप अंतिम झालेला नाही, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिले आहे. इस्रायली मंत्रिमंडळ लवकरच युद्धबंदीवर मतदान घेणार आहे. दरम्यान, नेतान्याहू यांनी हमासवर युद्धबंदीच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप केला आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने आज सांगितले की, हमास शेवटच्या क्षणी झालेल्या संघर्षातून मागे हटत नाही तोपर्यंत गाझा युद्धबंदी कराराला मंजुरी देण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ बैठक घेणार नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने हमासवर "शेवटच्या क्षणी सवलती मिळविण्याच्या" प्रयत्नात कराराच्या काही भागांपासून माघार घेतल्याचा आरोपही केला आहे. इस्रायली मंत्रिमंडळ आज या कराराला मान्यता देणार होते. ( Israel-Hamas Cease-Fire Deal )
इस्त्रायल-हमास संघर्षावर अमेरिकेने बुधवारी रात्री मोठी घोषणा केली. १५ महिन्यांनंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी झाली असल्याचे जाहीर केले; परंतु इस्रायलने अद्याप त्याची पुष्टी केलेली नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अद्याप युद्धबंदीवर सहमती दर्शवलेली नाही. इस्रायली मंत्रिमंडळ लवकरच युद्धबंदीवर मतदान करू शकते. दरम्यान, नेतान्याहू यांनी हमासवर युद्धबंदीच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मध्यस्थ हमासच्या बाजूने सर्व अटी मान्य करत नाहीत तोपर्यंत युद्धबंदी लागू होणार नाही, असा आग्रह नेतान्याहू यांनी धरला आहे.
एकीकडे जगभर इस्त्रायल-हमास युद्धबंदी करारावर झाला असल्याची चर्चा सुरु असतानाच इस्त्रायलने गाझावर पुन्हा एकदा हवाई हल्ला केला आहे. युद्धबंदी करारानंतर इस्रायलने गाझा पट्टीत ४५ हून अधिक पॅलेस्टिनींना ठार झाल्याचा दावा स्थानिक नागरिक करत आहेत. १५ महिन्यांच्या युद्धानंतर हमास आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा करार झाल्याची मध्यस्थांनी पुष्टी केल्यानंतर गाझामधील पॅलेस्टिनी लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
'टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, युद्धबंदी करार अद्याप अंतिम झालेला नाही. दरम्यान, युद्धबंदीचे कट्टर विरोधक असलेले अतिउजवे इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी युद्धबंदीचा इस्रायली समाजावर होणाऱ्या नकारात्मक परिणामावर एक नवीन विधान जारी केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आपण दुर्दैवी दिवसांच्या मध्यभागी आहोत, सर्व बंधकांना आपल्याकडे परत पाहण्याची इच्छा आहे. या करारासाठी इस्रायलला किती मोठी किंमत मोजावी लागेल. मला ठाम विश्वास आहे की बहुसंख्य जनता या कराराचा तिरस्कार करेल."
यापूर्वीही नेतन्याहू यांनी युद्धबंदी करारावर असहमती व्यक्त केली हाेती. बुधवारी (दि. १५) रात्री उशिरा स्थानिक माध्यमांशी बाेलताना त्यांनी सांगितले की, हमाससोबतचा युद्धविराम करार अंतिम करण्याचे काम सुरू आहे. नेतान्याहू यांच्या या विधानाच्या काही तास आधी अमेरिका आणि कतारने युद्धबंदी कराराची घोषणा केली होती. यामुळे गाझामधील १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात येण्याचा आणि मोठ्या संख्येने ओलिसांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या युद्धविराम करार कराराच्या घोषणेनंतर, मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी रस्त्यावर उतरले. त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.