Iran Israel War 
आंतरराष्ट्रीय

Iran Israel War : इस्रायलचे तेहरानमधील तेलसाठ्यांवर हल्ले

प्रदूषणाने विषारी पावसाची भीती; किमान चौघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

तेहरान : इस्रायल आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या संयुक्त हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इराणची राजधानी तेहरान येथील तेलसाठा केंद्रांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांनंतर शहराच्या आकाशात दाट काळा धूर पसरला असून किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे हल्ले युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच तेलसुविधांवर झाल्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.

तेलसाठे आणि रिफायनरी लक्ष्य

इराणच्या फर्स न्यूज एजन्सीनुसार, या हल्ल्यांमध्ये तेहरान आणि अल्बोर्झ प्रांतातील चार तेलसाठे व तेल हस्तांतरण केंद्राला लक्ष्य करण्यात आले. तेहरानच्या ईशान्य भागातील अघदसियेह तेल गोदाम, दक्षिणेकडील तेहरान रिफायनरी, पश्चिमेकडील शहरान तेल डेपो आणि कराज शहरातील तेलसाठा यांवर स्फोटक हल्ले झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की शहरान डेपोमधून मोठ्या प्रमाणात तेल रस्त्यांवर वाहून गेले, ज्यामुळे आग अधिक वेगाने पसरली.

टँकर चालकांचा मृत्यू, अग्निशमन सुरू

या हल्ल्यांमध्ये किमान चार टँकर चालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती फर्स वृत्तसंस्थेने दिली. मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला नाही. सध्या सुरक्षा दल आणि अग्निशमन पथके आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

स्थानिक पत्रकार असदी यांनी सांगितले की रविवारी सकाळी त्यांच्या घराच्या खिडक्यांवर काळसर पावसाचे थेंब पडताना दिसले. त्यांनी याला ‌‘विषारी धुराचे गंभीर संकट‌’ असे वर्णन केले. राजधानीत युद्ध आणि पर्यावरणीय संकट एकाच वेळी निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‌‘मानसिक युद्ध‌’ असल्याचा आरोप

काही विश्लेषकांच्या मते, तेलसाठ्यांवर केलेले हल्ले हे इराणवर दबाव निर्माण करण्यासाठी ‌‘मानसिक युद्धा‌’चा भाग आहेत. इंधनसाठे नष्ट करून इराणी सैन्याची हालचाल मर्यादित करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. मात्र, इराण मोठा देश असल्याने अशा हल्ल्यांमुळे संपूर्ण इंधनसंकट निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT