आंतरराष्ट्रीय

israel and hamas war: इस्रायल- हमास संघर्षात आतापर्यंत ५०० हून अधिक ठार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने हल्ला चढविल्यानंतर इस्रायलने युद्धाची (Israel-Palestine war) घोषणा केली आहे. पॅलेस्टाईन दहशतवादी गट हमासने शनिवारी सकाळी सुरू केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. (israel and hamas war)

इस्रायलमध्ये हमासद्वारे ३०० हून अधिक लोक मारले गेले आणि इस्रायल संरक्षण दलाने सुरू केलेल्या प्रत्युत्तरादाखल लष्करी कारवाईमध्ये गाझामध्ये २५६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात सुमारे २३० लोक मारले गेले आहेत. वेस्ट बँक प्रदेशातही मृत्यूची नोंद झाली आहे. इस्रायलने केलेल्या ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्समध्ये किमान १७०० लोक जखमी झाले आहेत. (israel and hamas war)

रविवारी सकाळी इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) आणि हमास यांच्यात चकमक सुरूच होती. इस्रायली मीडियाने वृत्त दिले आहे की दक्षिण इस्रायलच्या अनेक भागांमध्ये रॉकेट सायरन वाजत आहेत. गाझा पट्टीजवळील सिडरोट, किबुट्झ नीर आम, याड मॉर्डेचाई आणि नेटिव्ह हासारा सारख्या भागात इशारे देण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील ब्रीफिंगमध्ये इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याचे सांगितले.

गाझावरील इस्रायलचे हवाई हल्ले रविवारीही सुरूच होते. गाझा शहराच्या दाट लोकवस्तीचे केंद्र आणि इतर अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार बॉम्बस्फोट झाले. इस्त्रायली सरकारने गाझा पट्टीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज सकाळी सांगितले की, देश एक दीर्घ आणि कठीण युद्ध सुरू करत आहे आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ते चालूच राहील.

SCROLL FOR NEXT