तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी विरोधी पक्षनेते गादी आयसेनकोट यांनी चार प्रमुख अटी मांडल्या आहेत. यामध्ये हरेदी या अतिधार्मिक ज्यू समुदायालाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या अटी मान्य करणाऱ्या पक्षांसाठी आघाडीत सहभागी होण्याचा मार्ग खुला असल्याचे आयसेनकोट यांनी स्पष्ट केले आहे.
२७ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही आघाडीला बहुमत मिळालेले नाही. १२० सदस्यांच्या नेसेटमध्ये सरकार स्थापनेसाठी ६१ जागांची आवश्यकता आहे. आयसेनकोट यांच्या याशार पक्षाने २१ जागा जिंकल्या असून, विरोधी पक्षांमध्ये तो सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आयसेनकोट विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
खासदार फोडण्याचे नेतान्याहूंचे प्रयत्न?
दरम्यान, याशार पक्षाने नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षावर आपले खासदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. लिकूडचे काही नेते याशारच्या खासदारांना फोन करून नेतान्याहू यांना पाठिंबा देण्यासाठी राजी करीत असल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यामुळे इस्रायलमधील सत्तास्थापनेचा संघर्ष अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.
अशा आहेत चार अटी...
* इस्रायलची ज्यू आणि लोकशाहीवादी देश ही ओळख कायम राहावी. सरकारने सर्व नागरिकांना समान अधिकार द्यावेत आणि धर्म किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव करू नये.
* देशातील प्रत्येक नागरिकाला लष्करी, राष्ट्रीय किंवा नागरी सेवा बंधनकारक असावी. सध्या ज्यू नागरिकांसाठी लष्करी सेवा अनिवार्य असली, तरी अतिधार्मिक हरेदी समुदायाला त्यातून सवलत मिळत आली आहे. हरेदी समुदायाची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे.
* १९४८ मध्ये इस्रायलच्या स्वातंत्र्यावेळी निश्चित केलेल्या तत्त्वांचे पालन नव्या सरकारने करावे. लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय आणि सर्व नागरिकांना समान अधिकार ही मूल्ये जपली जावीत. नेतान्याहू सरकारने न्यायव्यवस्थेत बदल केले. वादग्रस्त कायदे रद्द केले जावेत.
* गाझामधील हमासचे शासन आणि त्याची लष्करी ताकद संपुष्टात आणणे.