इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू. Pudhari Photo.
आंतरराष्ट्रीय

Iran Israel War Update | युद्ध किती दिवस चालणार? : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिले उत्तर

Iran-Israel War Update |इराणावर आता कारवाई केली नसती, तर भविष्यात काहीच करता आले नसते

पुढारी वृत्तसेवा

Iran-Israel War Update

जेरुसलेम : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. आज (दि. ३ मार्च) या संघर्षाचा चौथा दिवस आहे. संपूर्ण जगाला तणावग्रस्त करणारे हे युद्ध आणखी किती दिवस चालणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आता याबाबत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हे युद्ध वर्षानुवर्षे चालणार नाही

'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले की, "इराणवरील आमच्या कारवाया अचूक आहेत. आता त्या संपूर्ण होण्यास काही काळ लागू शकतो; परंतु हे युद्ध वर्षानुवर्षे चालणार नाही. हे युद्ध नसून शांततेचे प्रवेशद्वार आहे."

इराणमधील सत्तांतर जनतेच्या हाती

इराणमधील सरकार बदलणे हे अंतिमतः तेथील जनतेच्या हातात आहे, परंतु अमेरिका आणि इस्रायल मिळून त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करत आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आताच लष्करी कारवाई करणे होते अनिवार्य

इराणचे नेतृत्व हे सुधारणेपलीकडे गेले होते. हे कट्टरपंथी नेतृत्व अमेरिका संपविण्यासाठी उतावीळ होते. जून २०२५ मध्ये झालेल्या १२ दिवसांच्या युद्धात इराणचे तीन प्रमुख अणू प्रकल्प उद्ध्वस्त केल्यानंतरही, इराणने पुन्हा गुप्त तळ उभारून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अणू शस्त्रे बनवण्याचे काम सुरू केले होते. जर आता कारवाई केली नसती, तर भविष्यात काहीच करता आले नसते. येत्या काही महिन्यांत इराणची अणू क्षमता रोखणे अशक्य झाले असते," असेही ते म्हणाले.

डोनाल्‍ड ट्रम्प हे जगातील सर्वात शक्तिशाली नेते

या युद्धात इस्रायलने अमेरिकेला ओढले, हा दावाच हास्यास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत. अमेरिकेसाठी जे योग्य आहे तेच ते करतात. त्यांच्यासारखा राष्ट्राध्यक्ष आजवर झाला नाही," असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्या खंबीर नेतृत्वाचे कौतुक केले.

इराकसारखे युद्ध लांबणार नाही : हेगसेथ

"इराकसारखे हे युद्ध दीर्घकाळ चालणार नाही. ही मोहीम शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी आहे, ना की तिथे सत्ता स्थापन करण्यासाठी," अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनीही या मोहिमेचे समर्थन केले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, ही मोहीम ४ ते ५ आठवडे चालेल असा अंदाज होता, परंतु गरज पडल्यास ती अधिक काळ सुरू राहू शकते.

चार दिवसांमध्‍ये भीषण विध्वंस

अमेरिकन अधिकाऱ्यांनुसार, आतापर्यंत इराणमधील १,२५० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. इराणची ११ जहाजे नष्ट झाली असून १० युद्धनौका बुडवण्यात आल्या आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. कुवेतवरील इराणी प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे ६ जवान शहीद झाले आहेत. जागतिक परिणाम: 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा तेल पुरवठा मार्ग बाधित झाल्याने जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत आणि विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT