गाझा /जेरुसलेम; वृत्तसंस्था : इस्रायलने आपल्या तुरुंगांमध्ये असलेल्या सुमारे 2000 पॅलेस्टिनी कैद्यांची तब्बल दोन वर्षांनंतर सुटका सुरू केली आहे. हमासने सोमवारी सर्व जिवंत इस्रायली ओलिसांना सोडल्यानंतर झालेल्या शांतता कराराचा हा भाग आहे. सुटका झालेले कैदी गाझामधील खान युनूस येथे पोहोचले असून, हजारो पॅलेस्टिनींनी त्यांना तिथे उत्साहात स्वागत केले, असे एएफपीने कळवले आहे.
शांतता कराराअंतर्गत दोन वर्षांनंतर इस्रायलने 2000 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.
सर्व जिवंत इस्रायली ओलिसांची हमासने रेड क्रॉसच्या ताब्यातून सुटका केली.
सुटका झालेले कैदी गाझाच्या खान युनूसमध्ये दाखल, तिथे उत्साही स्वागत.
इस्रायलने पॅलेस्टिनी नेते मारवान बरघौटी आणि दोन प्रमुख डॉक्टरांना सोडण्यास नकार दिला.
पॅलेस्टिनी आणि हमासचे झेंडे फडकावत, हजारोंच्या संख्येने लोक नासर रुग्णालयाजवळ जमले होते. या सुटकेचा त्यांनी जल्लोष केला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की, तुरुंगात छळ आणि कठोर परिस्थितीतून गेलेल्या या कैद्यांना काळजी आणि वैद्यकीय तपासणी पुरवण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कैद्यांना योग्य ती काळजी पुरवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सकाळी, ऑफेर तुरुंगातून रामल्लाह येथील व्याप्त पश्चिम किनार्यावर आणलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. कैदी बसमधून उतरताच अल्लाहू अकबर (ईश्वर महान आहे) चा जयघोष करत कुटुंब आणि मित्रांनी त्यांना मिठी मारली. दुसरीकडे अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, पॅलेस्टिनी कैदी सोडल्या गेलेल्या ऑफेर तुरुंगाजवळ इस्रायली सैन्याने पत्रकारांवर धुराचे गोळे फेकले. याआधी असोसिएटेड प्रेसने कळवले होते की, ऑफेर तुरुंगाजवळ जमलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या कुटुंबीयांवर इस्रायली ध्वज फडकवणार्या चिलखती वाहनातून अश्रुधूर आणि रबर बुलेटस्चा मारा करण्यात आला. कैद्यांना पाठिंबा दर्शविणार्या कोणालाही अटक केली जाईल, अशा चेतावणी देणारी पत्रकेही वाटण्यात आली होती.