इस्लामाबाद : गाझा येथील युद्धविरामाविरोधात पाकिस्तानात हिंसेचा आगडोंब उसळला आहे. पाकिस्तानच्या तहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) चे प्रमुख हाफिज साद हुसेन रिझवी यांना अनेक गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत 250 कार्यकर्ते ठार झाले आहेत. हिंसाचारात पाच पोलिसही ठार झाले आहेत तर दीड हजाराहून अधिक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
तहरिक-ए-लब्बैकचा लाहोरमध्ये हिंसाचार
म्होरक्या साद रिझवी गोळीबारात जखमी
पाच पोलिसांची हत्या, शेकडो गाड्या जाळल्या
पक्षाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रिझवी यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. यानंतर टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भयानक हिंसाचार सुरू केला. लाहोर आणि जवळच्या मुरीदके येथे शेकडो गाड्यांना आग लावण्यात आली आहे. यात 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पक्षाचा दावा आहे की, आतापर्यंत त्यांचे 250 हून अधिक कार्यकर्ते आणि नेते मारले गेले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
तहरिक-ए-लब्बैक या संघटनेचा गाझा युद्धविरामाला तीव्र विरोध आहे. याविरोधात लाहोरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यानच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेत रस्त्यावरच एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केली. यापूर्वी इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात फ्रान्सच्या विरोधात केलेल्या आंदोलनातही अनेक पोलिसांची हत्या केली होती. त्याच हिंसक वृत्तीची पुनरावृत्ती आता पुन्हा दिसून येत आहे.
सुरक्षा दलांनी मुरीदके येथील टीएलपीविरोधी छावणीला वेढा घातला आहे. इस्रायलविरोधी निदर्शनांमध्ये ही घटना घडली. टीएलपीने म्हटले आहे की, ते मागे हटणार नाही.
या हिंसक घटनेचा प्रमुख आणि आंदोलनासाठी लोकांना भडकवणारा साद रिझवी पोलिसांच्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ‘सर तन से जुदा’ (शिर धडावेगळे करणे) यांसारख्या कट्टर घोषणांना प्रसिद्धी देणाऱ्या खादिम हुसैन रिझवीचा साद हा मुलगा आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात रिझवीला अनेक गोळ्या लागल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
मुरीदकेमध्ये पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी कडक कारवाई केली. पाकिस्तान रेंजर्ससह सुरक्षा दलांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. निदर्शकांनी अनेक ठिकाणी छावण्या उभारल्या होत्या. परंतु मोठ्या प्रमाणात बॅरिकेडस् असूनही हिंसाचार उफाळला. शनिवारी झालेल्या निदर्शनांमध्ये पोलिसांनी 100 हून अधिक लोकांना अटक केली. त्यांचा वापर सुरक्षा दलांनी त्यांच्याविरुद्ध केल्याचा निदर्शकांचा आरोप आहे. मीडिया कव्हरेजवरही बंदी आहे.