इस्त्रायलने केलेला दावा खरा ठरला तर तर दोन दिवसांतील इराणच्या तिसऱ्या मोठ्या नेत्याची ही हत्या असेल. यापूर्वी मंगळवारी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि बासिज दलाचे प्रमुख गुलाम रझा सुलेमानी यांनाही ठार केल्याचा दावा इस्रायलने केला होता.
Iran-Israel War Escalation
जेरुसलेम : इराण युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत आहेत, तर दुसरीकडे इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहे. यादरम्यान इस्रायलने एक मोठा दावा केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्राईल काट्झ यांनी आज (दि. १८ ) माहिती दिली की, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) रात्रभर केलेल्या हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब ठार झाले आहेत. दरम्यान, इराणने अद्याप खतीब यांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
खतीब यांच्या मृत्यूची घोषणा करताना काट्झ यांनी अधिक तपशील न देता सांगितले की, "आज दिवसभरात सर्व आघाड्यांवर मोठे 'सरप्राइजेस' मिळण्याची शक्यता आहे." तसेच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्कराला कोणत्याही वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याला मारण्यासाठी अतिरिक्त परवानगीशिवाय पूर्ण मोकळीक दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इस्त्रायलने केलेला दावा खरा ठरला तर तर दोन दिवसांतील इराणच्या तिसऱ्या मोठ्या नेत्याची ही हत्या असेल. यापूर्वी मंगळवारी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि बासिज दलाचे प्रमुख गुलाम रझा सुलेमानी यांनाही ठार केल्याचा दावा इस्रायलने केला होता.
इस्माईल खतीब यांचा जन्म १९६० मध्ये इराणच्या दक्षिण खोरासान प्रांतातील घायनात येथे झाला होता. ते एक शिया धर्मगुरू होते, ज्यांनी इराणच्या न्यायपालिका आणि गुप्तचर मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'मध्ये सेवा बजावली होती. सायबर कारवायांमुळे २०२२ मध्ये अमेरिकेने खतीब यांच्यावर निर्बंध लादले होते. अमेरिकेच्या मते, खतीब सायबर हेरगिरी आणि रॅन्समवेअर हल्ल्यांशी संबंधित नेटवर्कचे नेतृत्व करत होते. दरम्यान, इस्रायलच्या या कारवाईचा तुर्कीने तीव्र निषेध केला आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी या कारवायांना "आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधातील बेकायदेशीर राजकीय हत्या" असे म्हटले आहे.