इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील तलाई भागातील ‘खदिजा अल-कुबरा’ मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटाचा उलगडा करण्यात पाकच्या सुरक्षा दलांना यश आले आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केल्याची माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी दिली. अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार हा अफगाणिस्तानचा नागरिक असून इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानने खोटारडेपणाचा कळस गाठत सवयीप्रमाणे कोणताही पुरावा नसताना भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आता मास्टरमाईंड अफगाण असल्याचे आणि हल्लेखोर स्थानिक असल्याचे सिद्ध झाल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे.
मशिदीत स्वतःला उडवून देणारा आत्मघाती हल्लेखोर हा मूळचा पाकिस्तानी नागरिकच होता. मात्र, त्याने हल्ल्यापूर्वी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. तेथे त्याला या हल्ल्याचे प्रशिक्षण आणि रसद पुरवण्यात आली होती अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या आरोपांचे खंडन करत पाकिस्तानने आपल्या अंतर्गत अपयशाचे खापर भारतावर फोडण्यापेक्षा स्वतःच्या भूमीवर पोसल्या जाणार्या दहशतवादाचा नायनाट करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.