पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशात वास्तव्यास असणार्या इस्कॉनच्या पुजाऱ्यांनी भगवे कपडे घालू नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणी टिळा लावून नये, असे आवाहन कोलकात्ताचे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी केले आहे. हा सल्ला किंवा सामान्य मार्गदर्शक तत्त्वे नाही; परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्हाला फोन करणाऱ्या साधू आणि भक्तांना ही माझी वैयक्तिक सूचना आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
राधारमण दास म्हणाले की, आमच्या अनेक भाविकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या आल्या आहेत किंवा त्यांना धमकावण्यात आले आहे,. बांगलादेशातील परिस्थिती चिंताजनक आहे. इस्कॉनचे आमच्या संपर्कात असणार्या पुजार्यांना सांगितले आहे की, त्यांनी इस्कॉनचे अनुयायी किंवा पुजारी म्हणून त्यांची ओळख सार्वजनिक करू नका. त्यांनी धर्माचे आचरण घरात किंवा मंदिरांमध्येच करावे. आम्ही त्यांना इतर लोकांचे लक्ष वेधून घेणार नाही असे कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. हा उपाय तात्पुरता आहे. केवळ त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आहे. असेही दास यांनी स्पष्ट केले.
चिन्मय कृष्ण दास यांचे वकील रमन रॉय यांच्या घरावर बांगलादेशमधील कट्टरवाद्यांच्या एका गटाने हल्ला केला आहे. रॉय यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव चिन्मय कृष्ण दास यांच्या बाजूने कोणताही वकील पुढे आला नाही. आम्ही बांगलादेश सरकारला चिन्मय कृष्ण दास या खटल्यात प्रतिनिधित्व करण्यास तयार असलेल्या वकिलाला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याची विनंती केली आहे, असेही राधारमण दास यांनी सांगितले.