इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारताविरोधात आगळिक करण्यात आघाडीवर असणार्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचे पंख छाटतानाच पाकिस्तानी लष्करालाही सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिली. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कृत्य थांबवून राजकीय हस्तक्षेपही टाळावा, अशी तंबी न्यायालयाने 'आयएसआय' आणि पाक लष्कराला दिली.
पाकिस्तानच्या स्वांतत्र्यापासून आतापर्यंत पाकमध्ये निम्मा कालावधी लष्करी राजवट राहिली आहे. लष्कर आणि 'आयएसआय'च्या पाठिंब्यामुळेच विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सत्तेत आल्याचेही जगजाहीर आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने 'आयएसआय' आणि लष्कराला त्यांची जागा दाखवून दिली आहे. न्यायालयाने खडसावताना स्पष्टपणे म्हटले आहे की, 'आयएसआय' आणि लष्कराने दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणे थांबवावे. चिथावणीखोर, द्वेषमुलक कृत्यामधील 'आयएसआय' आणि लष्कराच्या सहभागावर सरकारने अंकुश ठेवायला हवा.