अरबी समुद्रात तैनात अमेरिकेचे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन. 
आंतरराष्ट्रीय

Ayatollah Ali Khamenei | अमेरिकेने हल्ला केल्यास मध्य-पूर्वेत युद्ध करणार

इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा गंभीर इशारा; दोन्ही देशांत संघर्ष पेटण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

तेहरान; वृत्तसंस्था : इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेला रविवारी गंभीर इशारा दिला आहे.

इराणवर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला, तर मध्य- पूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू करणार व यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष पसरेल, असे खोमेनी यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ल्याची धमकी दिल्यानंतर इराणने हे विधान केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. इराणी सरकारी टेलिव्हिजनने खोमेनींच्या हवाल्याने म्हटले की, ‘अमेरिकन लोकांना हे माहीत असले पाहिजे की, त्यांनी युद्ध सुरू केले, तर यावेळी ते प्रादेशिक युद्ध असेल. आम्ही चिथावणीखोर नाही आणि आम्हाला कोणत्याही देशावर हल्ला करायचा नाही. मात्र, जो कोणी हल्ला करेल किंवा त्रास देईल त्याला इराण राष्ट्र योग्य उत्तर देईल.’ आता खोमेनी यांच्या या विधानामुळे मध्य-पूर्वेत संघर्ष पेटू शकतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते. यावर बोलताना खोमेनी यांनी या आंदोलनाची तुलना देशाच्या धार्मिक व्यवस्थेला आव्हान देणार्‍या बंदसोबत केली आहे. या आंदोलनात सहभागी होणार्‍या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे या आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांना सामूहिक फाशी दिली जाण्याचीही शक्यता आहे.

अमेरिका हल्ला करण्याच्या तयारीत

डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेची विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन आणि त्याच्यासोबत असलेल्या अमेरिकन युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. इराणवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका हल्ला करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराणकडूनही सरावाला सुरुवात

अमेरिकेच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेता इराणनेही होर्मुझच्या धोरणात्मक सामुद्रधुनीत लष्करी सरावांची योजना आखली आहे. हे ठिकाण पर्शियन आखाताचा महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणावरून जगातील तेलाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. त्यामुळे आता हे दोन्ही देश आता युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT