जेरूसलेम; वृत्तसंस्था : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इस्रायलने इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांना आपल्या ‘हिट लिस्ट’मधून तात्पुरते वगळले आहे. या निर्णयामागे पाकिस्तानची मध्यस्थी असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली होती की, इराणच्या या दोन वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करू नये. कारण, हे दोघेही संभाव्य चर्चेसाठी महत्त्वाचे दुवे मानले जात आहेत. इस्लामाबादमधील एका सूत्राने सांगितले की, ‘जर हे नेतेही संपवले गेले, तर संवादासाठी कोणी उरणार नाही.’ त्यानंतर अमेरिकेने इस्रायलला मागे हटण्याचा सल्ला दिला.
अब्बास अराघची हे अमेरिकेसोबतच्या अणू चर्चांमध्ये इराणचे प्रतिनिधित्व करत होते आणि ते अनुभवी मुत्सद्दी मानले जातात. तर गालिबाफ यांना व्हाईट हाऊसकडून ‘व्यवहार्य भागीदार’ म्हणून पाहिले जाते. रॉयटरच्या बातमीनुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा चर्चेचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी या दोघांना काही दिवसांसाठी लक्ष्यसूचीतून वगळण्यात आले.
सध्याच्या युद्धात इस्रायलने इराणच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केले आहे. सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी आणि सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला आहे.
द़ृष्टिक्षेपात...
* पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळे इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना तात्पुरता दिलासा
* अमेरिका-इराण चर्चेसाठी संवादाचे मार्ग खुले ठेवण्याचा प्रयत्न
* इस्रायलचे इराणी नेतृत्वावर सातत्याने लक्ष्य
* ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता