Parastoo Ahmadi File Photo
आंतरराष्ट्रीय

Parastoo Ahmadi 74 lashes: हिजाब न घालता गाणं गायल्याने गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा

'अश्लील आणि अनैतिक' मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रसिद्ध इराणी गायिका परस्तू अहमदी यांना प्रत्येकी ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

मोहन कारंडे

Parastoo Ahmadi 74 lashes

तेहरान: ऑनलाईन मंचावर 'अश्लील आणि अनैतिक' मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रसिद्ध इराणी गायिका परस्तू अहमदी आणि तिच्या निर्मिती पथकातील चार सदस्यांना प्रत्येकी ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. याशिवाय, या पाचही जणांवर पुढील दोन वर्षांसाठी कला, संगीत क्षेत्रातील कामकाज आणि परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे, असे वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

डिसेंबर २०२४ मध्ये परस्तू अहमदी हिने युट्यूबवर एक संगीत मैफल (व्हर्च्युअल कॉन्सर्ट) प्रसारित केली होती. कोम शहरातील ऐतिहासिक 'देईर-ए-गचिन कारवांसेराई' येथे कोणत्याही थेट प्रेक्षकांविना या मैफलीचे चित्रीकरण झाले होते. तिने पुरुष वादकांच्या साथीने गाणे सादर केले होते. यावेळी तिने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता, मात्र इराणमधील सक्तीचा हिजाब परिधान केला नव्हता. तिचा हा व्हिडिओ जगभरात मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला आणि इराणमधील महिला कलाकारांवरील निर्बंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

या सादरीकरणाची दखल घेत इराणी न्यायालयाने हा प्रकार देशाच्या कायदेशीर व धार्मिक मूल्यांचे उल्लंघन करणारा आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अहमदी आणि तिच्या पथकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक सभ्यता भंग करणे आणि अश्लील मजकूर प्रसारित करणे या आरोपांखाली न्यायालयाने जून महिन्यात त्यांना ७४ फटक्यांची शिक्षा सुनावली होती. सप्टेंबरमध्ये अपिलीय न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. वकील मुस्तफा निली यांच्या हवाल्याने 'एमतेदाद' या वृत्तसंस्थेने सोमवारी ही शिक्षा पार पडल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात एकूण नऊ जणांना शिक्षा झाली होती, मात्र उर्वरित चार जणांवरील कारवाईबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध

ऑक्टोबर महिन्यात 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल' या मानवाधिकार संघटनेने ही शिक्षा अमानवी आणि क्रूर असल्याचे म्हणत ती थांबवण्याचे आवाहन इराण प्रशासनाला केले होते. पाश्चात्य देशांनीही फटके मारण्याच्या शिक्षेचा निषेध केला आहे. मात्र, इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावत पाश्चात्य देशांनी स्वतःच्या देशातील मानवाधिकार प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे प्रत्युत्तर दिले आहे.

इराणमधील हिजाब आणि महिला कलाकारांवरील निर्बंध

२०२२ मध्ये हिजाब नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक झालेल्या महसा अमिनी हिच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर इराणमध्ये देशव्यापी निदर्शने झाली होती. तेव्हापासून तेहरानसह मोठ्या शहरांमध्ये अनेक महिला हिजाबविना सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी गाण्यास कडक निर्बंध आहेत. परस्तू अहमदी हिने आपल्या सादरीकरणातून हिजाब सक्ती आणि महिला कलाकारांवरील बंदी या दोन्ही नियमांना थेट आव्हान दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT