iran warns us woman your sons more in danger with trump amid missing pilot crisis
पुढारी ऑनलाईन :
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एका आईची वेदनादायी आर्त हाक जागतिक राजकारण अधिकच तापवताना दिसत आहे. हरवलेल्या अमेरिकन पायलटबाबत इराणकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे केवळ अमेरिकेचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेला तणाव आता आणखी गडद होत असल्याचे दिसते. अलीकडेच एका अमेरिकन महिलेने आपल्या हरवलेल्या पायलट मुलाबाबत भावनिक आवाहन केले होते, त्यावर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणने स्पष्टपणे म्हटले आहे की, तिचा मुलगा इराणच्या ताब्यात असण्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अधिक धोक्यात आहे.
त्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, तिचा मुलगा फायटर पायलट आहे आणि त्याच्याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. तिने लोकांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
यावर पाकिस्तानमधील इराणी दूतावासाने उत्तर देताना म्हटले, “तुमचा मुलगा इराणच्या कैदेत कमी, तर ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अधिक धोक्यात आहे. तो इराणच्या ताब्यात सुरक्षित राहावा यासाठी प्रार्थना करा.” इराणने असेही म्हटले की, “मुस्लिम आणि सुसंस्कृत इराणी म्हणून आम्हाला बंदिवानांशी सन्मानाने कसे वागावे हे ठाऊक आहे.” दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासानेही हेच मत पुन्हा व्यक्त केले आणि सांगितले की, इराणमध्ये युद्धकैद्यांचे अधिकार आधीच निश्चित आहेत आणि त्यांना मानवी आधारावर ठेवले जाते.
दोन अमेरिकन विमाने पाडल्याचा दावा
इराणने शुक्रवारी दोन अमेरिकन लष्करी विमाने पाडल्याचा दावा केला आहे. त्यापैकी एका पायलटची सुटका करण्यात आली असून, किमान एक पायलट अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, एक अमेरिकन A-10 अटॅक जेट फारसच्या आखातात कोसळले. मात्र, ते पाडण्यात आले की अपघातामुळे कोसळले, याची अमेरिकन अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.