तेहरान; वृत्तसंस्था : देशाच्या किनार्यांवर किंवा बेटांवर हल्ला झाल्यास संपूर्ण पर्शियन गल्फमध्ये समुद्री माईन्स टाकून वाहतूक पूर्णपणे ठप्प केली जाईल, अशी धमकी वजा इशारा इराणी संरक्षण परिषदेने दिला आहे. या इशार्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता वाढली.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, शत्रूने किनार्यांवर हल्ला केल्यास सर्व प्रवेशमार्ग आणि संवाद मार्गांवर विविध प्रकारच्या नौदल माईन्स टाकल्या जातील. यात तरंगत्या माईन्सचाही समावेश असेल, ज्यामुळे जहाजवाहतूक धोक्यात येईल. या कारवाईमुळे संपूर्ण पर्शियन आखात दीर्घकाळासाठी बंद होण्याची शक्यता आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा
इराणने स्पष्ट केले की, अशा परिस्थितीत संपूर्ण गल्फमध्ये सारखीच स्थिती निर्माण होईल. ही सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर ती आणि संपूर्ण गल्फ बंद झाला, तर जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
काही देशांना सवलत, इतरांसाठी निर्बंध
इराणने भारत, चीन आणि पाकिस्तान सारख्या ‘मैत्रीपूर्ण’ देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, इतर देशांच्या जहाजांवर हल्ले आणि माईन टाकल्याच्या बातम्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
1) किनार्यांवर हल्ला झाल्यास संपूर्ण गल्फमध्ये माईन टाकण्याचा इराणचा इशारा
2) होर्मुझसारखी परिस्थिती निर्माण होऊन जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
3) भारत, चीन, पाकिस्तानला मर्यादित सुरक्षित मार्ग; इतरांसाठी धोका कायम