तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले वाढल्यास जागतिक पुरवठा साखळी ठप्प करू, अशी धमकी इराणने दिली आहे. अल जजीराच्या वृत्तानुसार, इराणने म्हटले आहे की, आम्ही केवळ होर्मुझची सामुद्रधुनीच नव्हे, तर इतर सागरी मार्गही बंद करू.
इराणच्या सर्वोच्च नेत्याचे सल्लागार अली अकबर वेलायती म्हणाले की, कोणत्याही मोठ्या कारवाईला केवळ लष्करी स्तरावर उत्तर दिले जाणार नाही, तर जागतिक ऊर्जा आणि व्यापारावर परिणाम करून प्रत्युत्तर दिले जाईल. केवळ होर्मुझची सामुद्रधुनीच नाही, तर बाब-अल-मंदेबसारखे महत्त्वाचे सागरी मार्गही धोक्यात येऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अल्टिमेटम दिला असतानाच इराणने हा इशारा दिला आहे. दुसरीकडे, इराणचे निकटवर्तीय मानल्या जाणार्या येमेनच्या हुथी बंडखोरांनीही लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी इराणवर अत्यंत अश्लाघ्य टीका करत होर्मुझची सामुद्रधुनी न उघडल्यास मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. तसेच, होर्मुझ खुली न केल्यास त्याचे रूपांतर नरकात करू, असा इशारा दिला होता.
पाकचा युद्धविरामावर बोलण्यास नकार
इस्लामाबाद : इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी युद्धविरामाचा प्रस्ताव मांडल्याच्या वृत्तावर पाकिस्तानने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी म्हणाले की, अशा संवेदनशील प्रकरणांवर भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी केवळ इतकेच सांगितले की, शांतता प्रक्रिया सुरू असून विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युद्ध समाप्तीची चर्चा पाकिस्तानात होईल, असे म्हटले होते.