Iran-US Conflict: मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला असून, इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. याचबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) अमेरिकेचे MQ-9 ड्रोन पाडल्याचाही दावा केला आहे.
या घडामोडींना सुरुवात अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई कारवाईनंतर झाली. हॉर्मुझ सामुद्रधुनीत तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरत अमेरिकेने इराणमधील काही ठिकाणांवर हल्ले केले. तसेच इराणला जागतिक बाजारात कच्चे तेल विकण्याची परवानगी देणारा परवाना रद्द करण्यात आला.
या कारवाईनंतर इराणने प्रतिक्रिया देत "आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू," असा इशारा दिला. त्यानंतर बहरीन आणि कुवेतमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात आले.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने बहरीन आणि कुवेतमधील 85 अमेरिकन लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे इराणचे म्हणणे आहे.
इराणच्या अधिकाऱ्यांनी बुशेहर प्रांतातील खोरमूज परिसरात अमेरिकेचे MQ-9 ड्रोन पाडले, असा दावा केला आहे. अमेरिकेकडून झालेल्या कथित हवाई आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र, या दाव्याला अमेरिकेकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कुवेतच्या लष्कराने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अडवण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, नव्या हल्ल्यांमुळे या चर्चांवर अनिश्चिततेचे सावट आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल, इराण, अमेरिका आणि इराण समर्थित गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ले, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले, तसेच वाढती लष्करी हालचाल यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. या नव्या घडामोडींमुळे जागतिक तेलपुरवठा, प्रादेशिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.