Iran US conflict tension | इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? 
आंतरराष्ट्रीय

Iran US conflict tension | इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार?

चर्चांवर अनिश्चिततेचे सावट; ट्रम्प यांना इराणचा नवा प्रस्ताव अमान्य

पुढारी वृत्तसेवा

तेहरान / वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराणने युद्धबंदीचा नवा प्रस्ताव पाकिस्तानमार्फत सादर केला असला, तरी हाही प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. त्यानंतर अमेरिकेसोबत पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता असून, त्यासाठी आपण सज्ज असल्याचा दावा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने सादर केलेल्या नव्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. ‌‘सध्याच्या प्रस्तावाबाबत मी समाधानी नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी करार करा किंवा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, आठ एप्रिलपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने शांतता चर्चांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या चर्चांमध्ये कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. इराणने गुरुवारी सायंकाळी पाकिस्तानमार्फत नवीन प्रस्ताव सादर केला. मात्र त्यातील तपशील उघड करण्यात आलेले नाहीत.

इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जाफर असादी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, ‌अमेरिका कोणत्याही कराराचे पालन करत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे.‌ त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले की, अमेरिकन अधिकाऱ्यांची विधाने ही मुख्यतः माध्यमांसाठी असतात. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेचे उद्दिष्ट तेलाच्या किमती कमी होऊ न देणे आणि स्वतः निर्माण केलेल्या संकटातून बाहेर पडणे हे आहे.

या पार्श्वभूमीवर इराणचे सशस्त्र दल कोणत्याही नव्या कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील स्थैर्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जागतिकस्तरावर तेलाच्या किमती, व्यापार मार्ग आणि सुरक्षेवर याचा परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता या तणावाकडे लागले असून, पुढील काही दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT