Mohsen Rezaei File Photo
आंतरराष्ट्रीय

Iran US war: इराण-अमेरिका चर्चेची तयारी: तेहरानने ठेवल्या ७ कडक अटी; ट्रम्प यांच्या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही

पश्चिम आशियातील युद्धाच्या भडकलेल्या वणव्यात आता इराण आणि अमेरिका यांच्यात पडद्यामागून चर्चेची पार्श्वभूमी तयार होत असल्याचे दिसत आहे.

मोहन कारंडे

Iran US war

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील युद्धाच्या भडकलेल्या वणव्यात आता इराण आणि अमेरिका यांच्यात पडद्यामागून चर्चेची पार्श्वभूमी तयार होत असल्याचे दिसत आहे. इराणच्या 'सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल'चे सचिव मोहसेन रझाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरान अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार असून ही चर्चा कोणत्या अटींवर होईल, याची पूर्ण कल्पना वॉशिंग्टनला आहे. कतार आणि पाकिस्तानच्या मध्यस्थांमार्फत ही चर्चा सुरू असून इराणने आपल्या अटी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.

'अल जझीरा'ला दिलेल्या मुलाखतीत रझाई यांनी स्पष्ट केले की, युद्धाच्या या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी इराणच्या अटी मान्य करणे हेच अमेरिकेच्या फायद्याचे ठरेल. मात्र, चर्चेचा प्रस्ताव ठेवतानाच तेहरानने आपला आक्रमक पवित्राही कायम ठेवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे कोणताही मार्ग निघणार नाही, असे सांगत इराण कोणत्याही निर्णायक युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

इराणच्या प्रमुख अटी कोणत्या?

इराणने मांडलेल्या प्रमुख अटींमध्ये सर्व आघाड्यांवरील युद्ध तात्काळ थांबवणे, गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करणे आणि अमेरिकेने लावलेली सागरी नाकेबंदी उठवणे यांचा समावेश आहे. रझाई यांच्या मते, इराणला अमेरिकन सैन्याच्या कमकुवत बाजू चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि ताकदीने सज्ज झाला आहे. अलिकडेच इराणने अमेरिकेच्या विमानवाहू नौकेजवळ अँटी-शिप क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावाही त्यांनी केला.

याशिवाय, सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुती बंडखोरांमधील तणाव संपवण्याची इच्छाही इराणने व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांमधील युद्ध थांबवण्याचा तेहरानचा प्रयत्न असून हुती बंडखोरही सौदी अरेबियासोबत करारासाठी तयार असल्याचे रझाई यांनी सांगितले.

अमेरिकन नाकेबंदीदरम्यानही इराणच्या तेल विक्रीत वाढ

दुसऱ्या बाजूला, अमेरिकेच्या प्रचंड दबावाचा सामना करत असतानाही इराणने आपल्या कच्च्या तेलाची विक्री वाढल्याचा दावा केला आहे. इराणच्या 'प्लॅनिंग अँड बजेट ऑर्गनायझेशन'नुसार, सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची विक्री ३ अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. मात्र, अमेरिकेची सागरी नाकेबंदी असतानाही इराणने तेलाची निर्यात कशी सुरू ठेवली, याचा खुलासा या अहवालात करण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT