Iran US Israel Conflict Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran-US Israel war : ट्रम्प यांच्यासमोर वाढते आव्हान, अमेरिकेला मोठा आर्थिक फटका

इराणचे सैन्य कमकुवत झाले असले, तरी ते अमेरिकेला आणि त्याच्या सहयोगी देशांना आर्थिकदृष्ट्या मोठी किंमत मोजायला लावण्यात यशस्वी ठरले आहे.

पुढारी वृत्तसेवा

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : इराणविरुद्धच्या युद्धाच्या टप्प्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका कठीण निर्णयाच्या टोकावर उभे आहेत. आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी युद्ध सुरू ठेवायचे का, की वाढत चाललेल्या संघर्षातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा, अशी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. या दोन पर्यायांपैकी एक निवडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

इराणचे सैन्य कमकुवत झाले असले, तरी ते अमेरिकेला आणि त्याच्या सहयोगी देशांना आर्थिकदृष्ट्या मोठी किंमत मोजायला लावण्यात यशस्वी ठरले आहे. जागतिक ऊर्जा बाजारपेठा अस्थिर झाल्या असून, इराणने या प्रदेशातील डझनभर देशांवर विविध प्रकारचे हल्ले केले आहेत.

युद्ध सुरू ठेवले, तर आणखी अमेरिकन सैनिकांचे जीव धोŠयात येतील, आर्थिक खर्च वाढेल आणि सहयोगी देशांशी संबंध ताणले जाऊ शकतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांच्या राजकीय पाठीराख्यांमध्येही चिंता वाढत चालली आहे. कारण, त्यांनी यापूर्वी अमेरिकेला नव्या युद्धांमध्ये अडकू न देण्याचे आश्वासन दिले होते.

दुसरा पर्याय म्हणजे माघार घेणे; पण तसे केले तर ट्रम्प यांनी ठरवलेली अनेक उद्दिष्टे, विशेषतः इराणला पुन्हा कधीही अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता मिळू न देणे हे अद्याप पूर्ण झालेले नसेल.

अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिका-इस्रायल संयुक्त कारवाईत आतापर्यंत इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याचा मोठा भाग नष्ट करण्यात आला आहे. हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाली आहे आणि नौदल जवळपास निष्क्रिय झाले आहे.

तरीही इराणमधील धर्माधारित सत्ता अजूनही टिकून आहे. खामेनी यांचा जखमी मुलगा आता नेतृत्व करत असल्याचे मानले जाते. त्याने सायबर हल्ले, समुद्रात स्फोटके पेरणे आणि क्षेपणास्त्र हल्ले अशा युद्धतंत्रांचा वापर सुरू ठेवण्याची शपथ घेतली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि सरकार समर्थक मिलिशिया अजूनही सक्रिय आहेत.

ट्रम्प यांनी आताच माघार घेतली, तर जवळपास अणुबॉम्ब तयार करण्याइतŠया दर्जाचे युरेनियम इराणमध्येच राहील. त्या साठ्यापासून इराण दहा किंवा अधिक अण्वस्त्रे तयार करू शकतो, अशी भीती आहे.

युद्ध सुरू होताच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी त्या साठ्याला ताब्यात घेण्यासाठी जमिनीवर कारवाई करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, इराणच्या भूमिगत बोगद्यांमध्ये ठेवलेल्या या सामग्रीवर ताबा मिळवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना त्याचे परिणाम अधिक स्पष्ट होत आहेत. आतापर्यंत 13 अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत. अमेरिकेने मध्य पूर्वेत आधीपासून असलेल्या 50,000 सैनिकांबरोबर आणखी 2,500 मरीन सैनिक तैनात केले आहेत. हे निर्णय अमेरिकन सैन्याने इराणच्या तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेल्या खार्ग बेटावर हल्ला केल्यानंतर घेण्यात आले.

संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत जहाज वाहतुकीला असलेला धोका फारसा गंभीर नसल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात ही महत्त्वाची जलवाहिनी जवळजवळ बंद झाली आहे. यामुळे विशेषतः तेल व्यापारासह जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे.

ट्रम्प प्रशासनाला एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देण्याची इराणची क्षमता अपेक्षेपेक्षा जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT