सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात जो तणाव निर्माण झाला आहे, तो केवळ राजकीय कारणांमुळे नसून त्याला एक ज्योतिषीय पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. देशपांडे पंचांगात यासंदर्भात दीड वर्षापूर्वीच काही महत्त्वाची भाकिते वर्तवण्यात आली होती, जी आता खरी ठरताना दिसत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
३ मार्च रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचे परिणाम अत्यंत गंभीर असल्याचे भाकीत देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये आधीच देण्यात आले होते. या ज्योतिषीय विश्लेषणानुसार, 'म्लेच्छ' म्हणजेच प्रामुख्याने इस्लामिक राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पात आणि अशांतता निर्माण होईल, असे नमूद केले होते. तसेच, एखाद्या ख्यातनाम राजकीय व्यक्तीचा घातपाती मृत्यू होईल, असे स्पष्ट संकेत दीड वर्षापूर्वीच देण्यात आले होते. सध्याची इराणमधील परिस्थिती या भाकिताला दुजोरा देताना दिसत आहे, असे पंचांगकर्ते त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात.
पंचांगकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर १४ फेब्रुवारीपासून आकाशात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. १८ फेब्रुवारीला कुंभ राशीत पाच ग्रहांची युती झाली होती, तर सध्या रवी, बुध, मंगळ आणि राहू या चार ग्रहांची युती सुरू आहे. ‘ज्योतिषशास्त्र संहिता’ ग्रंथांनुसार, ‘एका राशीत जेव्हा चार किंवा पाच ग्रह एकत्र येतात, तेव्हा पृथ्वीवर रक्ताचा पूर वाहतो किंवा अतिवृष्टीमुळे जनसंहार होतो.’ म्हणजेच ही ग्रहांची स्थिती युद्धजन्य परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणावरील जीवितहानीचे प्रतीक मानली जाते.’’
‘‘वराहमिहिर यांनी ग्रहांच्या युतीचे चार प्रकार सांगितले आहेत. यात भेदयुती, अंशुमर्दन, अपसव्य आणि उल्लेख यांचा समावेश आहे. सध्या आकाशात अपसव्य प्रकारची युती पाहायला मिळत आहे. या युतीचे फलित युद्ध भूपानाम असे दिले आहे, ज्याचा अर्थ राजांमध्ये किंवा राष्ट्राध्यक्षांमध्ये युद्ध होणे असा होतो. अमेरिका आणि इराण या दोन बलाढ्य देशांमधील संघर्ष याच युतीचा परिणाम आहे,’’ असे मत पंचांगकर्त्यांनी मांडले आहे.
पंचांगकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘हे युद्धाचे सावट नेमके किती काळ टिकेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ज्योतिषीय गणितानुसार, चंद्रग्रहणाचे परिणाम साधारणपणे पुढील तीन महिन्यांपर्यंत जाणवत राहतात. त्यामुळे येणारे दोन ते अडीच महिने जगाला अशाच प्रकारचा नरसंहार किंवा युद्धजन्य तणाव अनुभवावा लागू शकतो,’’ असे त्यांनी सांगितले आहे.