आंतरराष्ट्रीय

Iran Israel War : इराणकडून पुन्हा शस्त्रसंधी : इस्रायल-इराणचे एकमेकांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले

येमेनच्या हुथी बंडखोरांचाही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

पुढारी वृत्तसेवा

जेरुसलेम/तेहरान : इस्रायल आणि इराण दरम्यान सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भीषण थेट लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. त्यामुळे युद्धाची ठिणगी पुन्हा पडण्याची शक्यता आहे. 8 एप्रिल रोजी झालेल्या तात्पुरत्या युद्धबंदीनंतर या दोन्ही देशांनी प्रथमच एकमेकांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात आता येमेनच्या हुथी बंडखोरांनीही उडी घेतली असून त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

इस्रायलने मध्य आणि पश्चिम इराणमधील अनेक भागांना सोमवारी पहाटे लक्ष्य केले. इराणची राजधानी तेहरान, इस्फाहान, कारज आणि तबरीझ शहरांमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलने इराणच्या खुझेस्तान प्रांतातील ‌‘महशार‌’ येथील एका पेट्रोकेमिकल कारखान्यावर हवाई हल्ला केला. त्याला नंतर इस्रायली लष्करानेही दुजोरा दिला. इराणने सुरक्षेचा उपाय म्हणून तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे तत्काळ बंद केली आहेत.

इराणचे चोख प्रत्युत्तर; ‌‘ऑपरेशन नसर‌’ सुरू

इस्रायलच्या या आगळिकीनंतर इराणच्या ‌‘रिव्होल्युशनरी गार्ड‌’ने इस्रायलवर प्रतिहल्ला चढवला. इराणने या कारवाईला ‌‘ऑपरेशन नसर‌’ (विजय) असे नाव दिले आहे. इराणने इस्रायलमधील दोन प्रमुख लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मध्य इस्रायलमध्ये इराणची क्षेपणास्त्रे रोखताना इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणेचे सायरन आणि स्फोटांचे आवाज दणाणत होते. इस्रायलने अमेरिकेची विनंती झुगारून रविवारी बैरुतच्या उपनगरांवर अचानक केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचे इराणने म्हटले आहे.

हुथी बंडखोर आणि सौदी अरेबियात हाय अलर्ट

या चालू युद्धाच्या 100 व्या दिवशी येमेनच्या इराण समर्थित हुथी बंडखोरांनीही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागून तणाव वाढवला. हुथींनी लाल समुद्रातील इस्रायलशी संबंधित जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियातील अमेरिकन तळ असलेल्या ‌‘प्रिन्स सुल्तान एअर बेस‌’ परिसरातही सोमवारी सकाळी क्षेपणास्त्रांचे सायरन वाजले. त्यामुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे.

थेट संघर्ष : इस्रायल आणि इराण दरम्यान 8 एप्रिल रोजी झालेल्या युद्धबंदीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी व औद्योगिक तळांवर थेट क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

100 दिवस पूर्ण : 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या या इराण युद्धाला सोमवारी 100 दिवस पूर्ण झाले.

हुथींची उडी : येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागत लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT