Iran Trump War | ट्रम्पच्या नव्हे, आमच्या अटी पूर्ण झाल्या तरच युद्धविराम! 
आंतरराष्ट्रीय

Iran Trump War | ट्रम्पच्या नव्हे, आमच्या अटी पूर्ण झाल्या तरच युद्धविराम!

पुढारी वृत्तसेवा

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर नव्हे, तर इराणच्या अटींवर युद्ध थांबवू, अशी ठाम भूमिका इराणने घेतली आहे. युद्ध केव्हा थांबवायचे हे ट्रम्प यांनी आम्हाला सांगू नये, अशा शब्दांत इराणने फटकारले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणसमोर सादर केलेला शांतिवार्ता आराखडा इराणने फेटाळून लावला आहे.

अमेरिकेने सुचवलेल्या शांतता प्रस्तावात इराणच्या अणू कार्यक्रमावर निर्बंध, क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा आणि प्रादेशिक प्रभाव कमी करण्याच्या अटींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मात्र, इराणने या अटींना सार्वभौमत्वावर आघात असल्याचे म्हणत नाकारले आहे. इराणी अधिकार्‍यांनी, ‘अमेरिका स्वतःशीच चर्चा करत आहे,’ असे म्हटले आहे. तसेच, युद्ध कधी आणि कशा प्रकारे संपवायचे हे आम्हीच ठरवू, असेही स्पष्ट केले.

इकडे शांतिवार्ता, तिकडे हल्ले सुरूच

पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त यासारख्या देशांकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी युद्धविरामाबाबत ठोस प्रगती झालेली नाही. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच असून, या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर; विशेषतः तेलाच्या किमतींवर होत आहे.

कोणत्या मुद्द्यांवर मतभेद?

* अणू कार्यक्रम बंद करण्याची अमेरिकेची मागणी

* इराणने क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालावेत

* निर्बंध हटवण्याची आणि नुकसानभरपाईची इराणची मागणी

* भविष्यातील हल्ल्यांपासून हमीची मागणी; याशिवाय इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकन तळ हटवण्याची मागणीही केली आहे; ही मागणी अमेरिका मान्य करण्यास तयार नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT