पुढारी ऑनलाईन डेस्क : इराण आणि अमेरिकेत पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी दिली आहे. तर इराणने अमेरिकेशी थेट चर्चेस नकार दर्शवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बॉम्बहल्ल्याच्या धमकीला आम्ही घाबरत नसून, गरज पडल्यास अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी त्यांची भूमिगत क्षेपणास्त्रे सज्ज आहेत, असे प्रत्युत्तर इराणने दिले आहे. याबाबतचे वृत्त इराण सरकारची अधिकृत वृत्तसंस्था तेहरान टाईम्सने दिले आहे.
ट्रम्प यांनी रविवारी इशारा दिला होता की जर इराणने अणू करार मान्य करण्यास नकार दिला तर इराणवर बॉम्ब हल्ला करणे हा एकमेव पर्याय राहील. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर, तेहरान टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की इराणने देशभरातील भूमिगत ठिकाणी त्यांची क्षेपणास्त्रे रेडी-टू-लाँच मोडमध्ये ठेवली आहेत. जी हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार केलेली आहेत.
एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले आहे, "जर इराणने अणू करार केला नाही तर बॉम्बहल्ले होतील. असे बॉम्बहल्ले होतील की जे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील." त्यांनी पुढे असाही इशारा दिला की ते इराणवर शुल्क लागू करतील.
अमेरिकेकडून इराणचा अणू कार्यक्रम रद्द करण्याची मागणी होत असताना, इराणने मात्र अमेरिकेशी कोणत्याही थेट वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, त्यांनी अप्रत्यक्ष चर्चा सुरुच ठेवली आहे.
दूरचित्रवाणीवरुन संबोधित करताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन म्हणाले, "आम्ही चर्चेस नकार दिलेला नाही; आश्वासनांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत आमच्यासाठी समस्या निर्माण झाल्या," ते पुढे म्हणाले की, त्यांनी हे सिद्ध करावे की ते विश्वासार्ह आहेत." एपीच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला पाठवलेल्या पत्रानंतर इराणकडून ही पहिली प्रतिक्रिया आली आहे.
ट्रम्प यांनी १२ मार्च रोजी यूएईच्या एका राजदूतामार्फत इराणला एक पत्र पाठवले होते. त्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांना अणू कार्यक्रमावर नव्याने चर्चेसाठी आमंत्रित केले होते. जर इराणने या चर्चेत सहभाग घेतला नाही तर इराणला अण्वस्त्रे निर्मिती करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेला काहीतरी करेल, अशी धमकीही दिली होती.
ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात २०१८ मध्ये इराणसोबतचा २०१५ चा अणू करार रद्द केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दबाव रणनितीचा अवलंब करत इराणवर पुन्हा निर्बंध लादले.
अमेरिकेकडून येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओत त्यांच्या भूमिगत क्षेपणास्त्र ठिकाणांचा खुलासा केला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) कडून "क्षेपणास्त्र शहर" म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या या ८५ सेकंदांच्या या क्लिपमध्ये इराणची अत्याधुनिक शस्त्रे आणि जमिनीवर रंगवलेल्या इस्रायली ध्वजावर पाऊल ठेवणारे त्याचे सैन्य दाखवण्यात आले होते.