Iran massive protests
तेहरान : इराणमध्ये सरकारविरोधात सुरु असलेले आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने केला आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार ६०० मृत्यूंची नोंद असली तरी, मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, १०,००० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
'रॉयटर्स'ने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खाेमोनी यांनी निदर्शकांना चिरडण्यासाठी सुरक्षा दलांना आंदोलक दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहे. १९७९ च्या क्रांतीनंतर इराणला बसलेला हा सर्वात मोठा सत्ताविरोधी धक्का मानला जात आहे. सरकारच्या तिन्ही प्रमुख अंगानी घेतलेल्या बैठकीनंतर 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) आणि 'बसीज' मिलिशियाला बळाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सरकारने या हत्यांमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.
राजधानी तेहरानमध्ये लष्करी छावणीचे स्वरूप इराणमध्ये सध्या इंटरनेट आणि फोन सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या रस्त्यांवर निमलष्करी दले, दंगल नियंत्रण पोलीस आणि साध्या वेशातील सुरक्षा रक्षक तैनात आहेत. हातात शॉटगन, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि ढाली घेतलेले जवान प्रत्येक चौकावर लक्ष ठेवून आहेत. आंदोलनादरम्यान अनेक बँका आणि सरकारी कार्यालये जाळण्यात आली असून एटीएम फोडण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने उघडण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या लष्करी कारवाईची भीती एककीकडे देशांतर्गत असंतोष असताना, दुसरीकडे अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईमुळे इराणी नागरिक चिंतेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चर्चेचे आवाहन केले असले तरी, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, गरज पडल्यास अमेरिका लष्करी पर्याय निवडेल. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी 'अल जझीरा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या सतत संपर्कात आहेत. आंदोलनापूर्वी आणि नंतरही दोन्ही देशांमधील संवाद सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र, इराणची सार्वजनिक भूमिका आणि खाजगी पातळीवर दिली जाणारी आश्वासने यात तफावत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.