आंतरराष्ट्रीय

Iran Protest : इराणमध्ये आंदोलक जुळ्या बहिणींवर क्रूर कारवाई, एकीला फाशी, तर दुसऱ्या बहिणीला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

तेहरान : इराणमध्ये जानेवारी महिन्यात सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या १९ वर्षीय जुळ्या बहिणींवर सत्ताधाऱ्यांनी सूडबुद्धीने कारवाई केली आहे. एकाच आंदोलनात सहभागी असूनही न्यायालयाने तारानेह रहिमीला फाशीची, तर रोमिनाला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

तारानेह आणि रोमिना रहिमी या दोघींना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डस्‌ कॉर्प्सच्या मुखवटाधारी जवानांनी मध्यरात्री घरातून ताब्यात घेतले होते. तब्बल चार महिने कुटुंबीयांना त्यांची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. पाच महिन्यांपूर्वी डोवलाताबाद तुरुंगात जेव्हा आईने त्यांना पाहिले, तेव्हा अमानुष मारहाणीमुळे त्यांचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला होता. केस धरून फरफटत नेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर जखमा झाल्या होत्या आणि हात-पाय फ्रॅक्चर झाले होते. बहिणीवर बलात्कार करण्याची धमकी देऊन तारानेहकडून जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेण्यात आला होता.

इराणी न्यायालयाने नुकताच या प्रकरणी धक्कादायक निकाल दिला आहे. अपील करण्यासाठी १८ दिवसांची कायदेशीर मुदत असतानाही नियम डावलून फाशी दिली जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या चुलत भावाने सांगितले की, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि विरोध दडपण्यासाठीच निष्पाप तरुणीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इराणमध्ये चालू वर्षात आतापर्यंत ५०० हून अधिक कैद्यांना फाशी देण्यात आली असून यात २९ आंदोलकांचा आणि १६ महिलांचा समावेश आहे. एकट्या इस्फहान शहरात ७० हून अधिक नागरिक फाशीच्या छायेत आहेत. नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अमानुष कारवाईविरोधात ब्रिटनसह ३० हून अधिक देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणचा निषेध नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT