‘शत्रूला खटकणारा नेताच हवा’; नव्या उत्तराधिकाऱ्याबाबत निकष स्पष्ट
हल्ल्यांमुळे नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेत अडथळे
निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब प्रक्रियेवरून मतभेद
सध्या सर्व सदस्यांची बैठक घेणे अशक्य
Iran Supreme Leader Succession
तेहरान : इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला अली खमेनी यांच्यानंतर देशाची धुरा कोणाकडे जाणार, यावर तज्ज्ञांच्या समितीचे (Assembly of Experts) एकमत झाले आहे. सध्या सुरू असलेले युद्ध आणि राजकीय तणाव पाहता, खबरदारी म्हणून नवीन नेत्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
आयातुल्ला अली खमेनी यांच्या निधनानंतर इराणच्या 'तज्ज्ञ समितीने' (Assembly of Experts) देशाच्या पुढील सर्वोच्च नेत्याची निवड जवळपास निश्चित केली आहे. या समितीचे सदस्य आयातुल्ला मोहम्मदमेहदी मीरबाकेरी यांनी रविवारी माहिती दिली की, नवीन नेत्याच्या नावावर सर्व धर्मगुरूंचे एकमत झाले आहे.सध्या केवळ काही तांत्रिक आणि कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याने अधिकृत घोषणा थांबली आहे. मात्र, नवीन उत्तराधिकारी निवडीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे, असे वृत्त इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने दिले आहे.
इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याची निवड झाली असली तरी, या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब कसे करावे, यावरून धर्मगुरूंच्या समितीत दोन गट पडले आहेत. काही सदस्यांच्या मते, एवढ्या मोठ्या निर्णयासाठी सर्वांनी प्रत्यक्ष एकत्र येणे आवश्यक आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव इतर सदस्य प्रत्यक्ष बैठक टाळून निर्णय जाहीर करण्याच्या बाजूने आहेत.
समितीचे सदस्य अयातुल्ला मोहसेन हैदरी अलेकासिर यांनी स्पष्ट केले की, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने सर्व सदस्यांची बैठक घेणे शक्य नाही. ही एक 'असाधारण' वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, धर्मगुरूंच्या या मंडळाला एकत्र बोलावणे धोक्याचे ठरू शकते. अशा वेळी कोणत्याही हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास तो इराणच्या शत्रूंच्या फायद्याचा ठरेल आणि देशाच्या क्रांतीला बाधा पोहोचेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
इराणमधील ताज्या घडामोडींनुसार, युद्ध आणि वाढत्या हल्ल्यांमुळे नवीन सर्वोच्च नेत्याच्या घोषणेमध्ये अडचणी येत आहेत. : २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते खमेनी यांच्यासह अनेक मोठे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. कोम शहरातील 'तज्ज्ञ समितीच्या' एका इमारतीवरही हवाई हल्ला झाला आहे. समितीचे सदस्य अयातुल्ला मोहसेन हैदरी अलकासिर आणि अहमद अलकासिर यांनी दुजोरा दिला आहे की, नवीन उत्तराधिकाऱ्याची निवड प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्याची जबाबदारी समितीच्या सचिवालयाचे प्रमुख अयातुल्ला हाशेम होसेनी बुशेहरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करताना जुन्या नेत्यांच्या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. शत्रू द्वेष करेल असाच नवीन नेता असा असावा. दिवंगत नेत्यांच्या सल्ल्यानुसार, इराणच्या सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्ती शत्रूच्या डोळ्यात खुपणारीच असायला हवी. समितीचे सदस्य हैदरी अलकासिर यांच्या मते, अमेरिकेने देखील या नवीन नेत्याच्या नावाचा उल्लेख केला आहे, जे त्यांच्या निकषात बसते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांचा मुलगा मोज्तबा खामेनी हा पुढील उत्तराधिकारी असू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, याचवेळी त्यांनी अशा निवडीला विरोध दर्शवत इशाराही दिला होता.