तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता समुद्राच्या पटलावरही सुरू झाले आहे. या युद्धाने रौद्ररूप धारण केले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) गुरुवारी दावा केला की, त्यांच्या नौदलाने उत्तर पर्शियन खाडीत एका अमेरिकन तेल टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. ‘आयआरजीसी’च्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर संबंधित जहाजाने पेट घेतला, हे जहाज अद्यापही जळत आहे. याशिवाय इराणनने अझरबैजानवरही हल्ला चढवला.
इराणने अनेक भागांत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू ठेवले. अहवालात असेही म्हटले आहे की, अझरबैजानवर पहिल्यांदाच हल्ला करण्यात आला. अझरबैजानमध्ये ड्रोन हल्ल्यात दोन लोक जखमी झाले आणि विमानतळ टर्मिनलचे नुकसान झाले. अझरबैजानने हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. इराणी सैन्याने ड्रोन हल्ल्याचा इन्कार केला आहे आणि म्हटले आहे की, हे इस्रायलचे ‘फॉल्स फ्लॅग’ ऑपरेशन असू शकते. इराणी स्टेट मीडिया ‘मेहर न्यूज’च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून अमेरिका, इस्रायल अथवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांची लष्करी अथवा व्यापारी जहाजे जाऊ दिली जाणार नाहीत. अशी जहाजे दिसल्यास त्यांना लक्ष्य केले जाईल आणि युद्धाच्या काळात या समुद्री मार्गावर केवळ इराणचेच नियंत्रण असेल, असा इशारा ‘आयआरजीसी’ने दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हिंदी महासागरात काही तासांपूर्वीच अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका ‘टॉर्पेडो’च्या साहाय्याने बुडवली. ही युद्धनौका भारतातील ‘मीलन 2026’ नौदल सरावातून परतत होती. तिच्यावरील जवळपास 100 हून अधिक क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा बदला म्हणून जशास तशी कारवाई करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. यापूर्वी अमेरिकेने इराणचे असे दावे फेटाळून लावले आहेत. इराणने यापूर्वी तीन अमेरिकन-ब्रिटिश टँकरवर हल्ला करून सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिकेने इराणच्या नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, त्यांची 20 हून अधिक जहाजे बुडवली आहेत. ‘सेंटकॉम’च्या मते, इराणचे नौदल आता ‘इतिहासजमा’ झाले आहे.
दिवस सहावा इराणमधील मृतांची संख्या 1,230 वर
अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या 1,230 वर पोहोचल्याचे इराणने म्हटले आहे. इराणच्या ‘तस्निम न्यूज’ एजन्सीने ‘फाऊंडेशन फॉर मार्टर्स अँड वेटरन्स अफेयर्स’चा हवाला देत हे म्हटले आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर संयुक्त लष्करी हल्ला केला. तेव्हापासून इराणी अधिकारी दररोज मृतांची संख्या जाहीर करत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, मृतांमध्ये नागरिकांसह सुरक्षा दलातील सदस्यांचाही समावेश आहे.
खामेनी यांच्या निधनानंतर भारत सरकारकडून अधिकृतपणे शोक व्यक्त
नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर भारत सरकारने अधिकृतपणे शोक व्यक्त केला. भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी दूतावासात ठेवलेल्या शोकपुस्तकावर स्वाक्षरी केली आणि शोक व्यक्त केला. दरम्यान, 28 फेब्रुवारीला खामेनी यांची हत्या झाल्यानंतर भारताने शोक व्यक्त केला नव्हता म्हणून केंद्र सरकारवर काँग्रेसने टीकाही केली होती. विक्रम मिस्री यांनी इराणच्या राजनैतिक प्रतिनिधींशी चर्चा करून भारताचा शोकसंदेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. भारताने इराणशी दीर्घकाळ राजनैतिक आणि आर्थिक संबंध राखले आहेत. म्हणूनच, या घटनेला भारताने दिलेला प्रतिसाद प्रादेशिक राजनैतिकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो.