दुबई; वृत्तसंस्था : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने बुधवारी जड आणि बहुवॉरहेड क्षेपणास्त्रांचा मोठा मारा केल्याचा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) अमेरिकन लष्करी तळांसह गल्फ प्रदेशातील अनेक ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगितले. या हल्ल्यांमुळे कुवेत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये सतर्कता वाढली आहे.
‘आयआरजीसी’च्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सैन्याच्या मुख्यालयावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी दोन कुवेतमधील कॅम्प अरिफजान तळाकडे लक्ष्यित होती. मात्र, कुवेतच्या अधिकार्यांनी याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. कुवेत नॅशनल गार्डने देशाकडे येणारी आठ ड्रोन पाडल्याचे सांगितले.
कतारची राजधानी दोहा येथेही बुधवारी सकाळी स्फोटांचे आवाज ऐकू आले. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने देशाच्या हवाई संरक्षण प्रणालीने येणारी क्षेपणास्त्रे अडवून नष्ट केल्याचे सांगितले. या प्रकारचे अडथळे आता गल्फ देशांमध्ये वारंवार दिसत असल्याचे स्थानिक वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले.
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने शायबा तेलक्षेत्राकडे येणारे पाच ड्रोन नष्ट केल्याचे सांगितले. पूर्व प्रांतात आणखी दोन ड्रोन पाडण्यात आले.
बहरीनमध्ये माणामा जवळील सितरा भागात ड्रोन हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले असून, त्यात काही मुलांचाही समावेश आहे. एका निवासी इमारतीवर ड्रोन आदळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले.