तेहरान; वृत्तसंस्था : इराणमध्ये आंदोलकांविरोधात आता सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर उतरले असून, हजारोंच्या संख्येने लोक रॅली काढत आहेत. सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आंदोलनांमुळे देशाचे झालेले नुकसान आणि जीवितहानी लक्षात घेऊन इराण सरकारने देशभर तीन दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे.
या काळात सर्व सरकारी इमारती आणि दूतावासांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील. सर्व सरकारी उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. रेडिओ आणि टेलिव्हिजनवर मनोरंजनाच्या कार्यक्रमांऐवजी धार्मिक आणि शोकपर कार्यक्रम प्रसारित केले जातील. या आंदोलनांमध्ये आतापर्यंत किमान 538 लोकांचा मृत्यू झाला असून 10,670 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारने इंटरनेट आणि फोन सेवा बंद केल्यामुळे जमिनीवरील नेमकी परिस्थिती जाणून घेणे कठीण झाले आहे. दरम्यान, आंदोलकांविरोधात जनतेचा संताप राजधानी तेहरानमध्ये आंदोलकांकडून केल्या जाणार्या हिंसक घटनांच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांचे हिंसक हल्ले देशाची सुरक्षा आणि शांततेसाठी धोका असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी परदेशी राजदूतांना संबोधित करताना स्पष्ट केले की, आम्हाला युद्ध नको आहे; पण आम्ही युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. त्यांनी अमेरिकेसोबत गंभीर आणि वास्तविक चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, ही चर्चा समान हक्क आणि परस्पर आदरावर आधारित असावी, अशी अट ठेवली आहे.