Iran Strait of Hormuz charges
तेहरान: अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षामध्ये इराणकडून आता हॉर्मुझची सामुद्रधुनी मधून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारले जात आहे. काही विशिष्ट जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यासाठी लाखो डॉलर्सची मागणी केली जाते. युद्धाचा अवाढव्य खर्च भागवण्यासाठी इराण एका जहाजाकडून तब्बल २० लाख डॉलर्स (सुमारे १६ ते १७ कोटी रुपये) वसूल करत असल्याची माहिती समोर आली आहे.
'इराण इंटरनॅशनल'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलादीन ब्रूजेर्दी यांनी या वसुलीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "युद्धासाठी मोठा खर्च येतो, त्यामुळे आम्ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून 'ट्रान्झिट शुल्क' आकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम दिला आहे. "जर इराणने ४८ तासांच्या आत हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही, तर इराणचे वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील," असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर देताना इराणने प्रतिआव्हान दिले की, इस्रायलचे ऊर्जा प्रकल्पही इराणच्या टप्प्यात असून ते एका दिवसात नष्ट करण्याची क्षमता इराणकडे असल्याचे म्हटले आहे.
जागतिक बाजारपेठेवर या तणावाचे सावट स्पष्टपणे दिसत आहे. आयजी मार्केटचे विश्लेषक टोनी सायकामोर यांच्या मते, ट्रम्प यांच्या धमकीमुळे जागतिक बाजारावर 'टाइम बॉम्ब' टिक-टिक करत आहे. जर हा वाद ४८ तासांत निवळला नाही, तर सोमवारी जागतिक शेअर बाजार कोसळून 'ब्लॅक मंडे' ओढवू शकतो आणि कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.
इराणच्या सैन्य दलाने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी कायमची बंद करण्यात येईल. जोपर्यंत उद्ध्वस्त झालेले प्रकल्प पुन्हा उभे राहत नाहीत, तोपर्यंत एकही जहाज तिथून हलणार नाही.
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी स्पष्ट केले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. इराणला जगाचा ऊर्जा पुरवठा थांबवू देणार नाही. दरम्यान, अमेरिकेची युद्धनौका आणि लँडिंग क्राफ्ट्स आधीच या क्षेत्राकडे रवाना झाली आहेत.