Iran attacks US bases file photo
आंतरराष्ट्रीय

Iran attacks US bases: युद्धविराम संपला!इराणकडून कुवेतमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकेचेही जोरदार प्रत्युत्तर

इराणने बुधवारी कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.

मोहन कारंडे

Iran attacks US bases

तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यातील तात्पुरता युद्धविराम अखेर संपुष्टात आला आहे. इराणने बुधवारी कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. पर्शियन गल्फ (इराणचे आखात) परिसरात अमेरिकेकडून होत असलेल्या कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा इराणची सरकारी वृत्तवाहिनी 'आयआरआयबी'ने केला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही चोख प्रत्युत्तर देत इराणच्या 'केश्म बेटावर' प्रतिहल्ले केले आहेत.

इराणचा दावा अमेरिकेने फेटाळला; 'केश्म'वर एअरस्ट्राईक

इराणने बहरीन येथील अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याच्या मुख्यालयावर आणि इतर लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिकेने हा दावा साफ फेटाळून लावला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकन सैन्याने इराणच्या केश्म बेटावरील लष्करी ग्राऊंड कंट्रोल स्टेशनवर क्षेपणास्त्र डागून ते उद्ध्वस्त केले. या संपूर्ण संघर्षात कोणत्याही अमेरिकन सैनिकाला इजा झाली नसल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे.

कुवेतची धावपळ; हवेतच उडवली इराणी क्षेपणास्त्रे

इराणच्या या हल्ल्यामुळे कुवेतमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. कुवेतच्या विविध भागांत प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. कुवेती लष्कराच्या जनरल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणकडून आलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच यशस्वीपणे पाडले. कुवेतचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सौद अब्दुलअजीज अल-ओतैबी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "हवाई सुरक्षेच्या कारवाईमुळे जमिनीवर पडलेल्या क्षेपणास्त्रांच्या अवशेषांना किंवा संशयास्पद वस्तूंना हात लावू नये, ते धोकादायक असू शकतात. काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ '११२' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा." तसेच नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

इराणचे तिन्ही हल्ले अपयशी: सेंटकॉम

अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, इराणने शेजारील देशांच्या दिशेने डागलेली सर्व बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे लक्षापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. कुवेतच्या दिशेने आलेली दोन इराणी क्षेपणास्त्रे हवेतच निकामी झाली. बहरीनच्या दिशेने डागलेली तीन क्षेपणास्त्रे अमेरिका आणि बहरीनच्या संयुक्त हवाई संरक्षण यंत्रणेने तात्काळ नष्ट केली. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या दिशेने इराणने सोडलेले तीन 'वन-वे अटॅक ड्रोन' देखील अमेरिकन सैन्याने हवेतच पाडले. "आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. युद्धविरामाच्या काळात इराणकडून झालेल्या या चिथावणीखोर कृत्याला उत्तर देण्यास आणि आमच्या मित्रदेशांचे रक्षण करण्यास अमेरिकन सैन्य पूर्णपणे सज्ज आहे," असे युएस सेंट्रल कमांड म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT