वॉशिंग्टन, तेहरान, कराची; वृत्तसंस्था : जगासमोर अभूतपूर्व असे ऊर्जा संकट निर्माण करणारी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यावर इराण आणि अमेरिका सहमतीच्या टप्प्यावर आले आहेत. येत्या काही दिवसांत जगाला एक चांगली बातमी मिळेल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी रविवारी नवी दिल्लीत सांगितले; तर अमेरिका आणि इराण यांच्यात कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एका करारावर बर्याच अंशी वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत, असे वॉशिंग्टनहून आलेल्या वृत्तात म्हटले आहे.
प्रस्तावित सामंजस्य करारामध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी मार्ग पुन्हा खुला करणे आणि इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्ध संपवणे यावर भर देण्यात आला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या आशावादी विधानानंतरही इराणच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की, या सामुद्रधुनीवरील स्वामित्व, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि लेबनॉनमधील इराण समर्थित गटांचे संघर्ष यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर अद्याप मतभेद आहेत.
ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर सांगितले की, अमेरिका, इराण आणि प्रदेशातील इतर अनेक देशांमधील करारावर वाटाघाटी झाल्या असून, लवकरच अंतिम तपशील जाहीर केला जाईल. 28 फेब्रुवारीपासून बहुतांश जहाजांसाठी बंद असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा या प्रस्तावित शांतता करारात समावेश असेल, असे त्यांनी नमूद केले. या चर्चेत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त, जॉर्डन आणि बहरीन या देशांचाही सहभाग असल्याचे ट्रम्प म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी सकारात्मक बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
* इराण आगामी 60 दिवसांच्या मुदतीत आपल्याकडील युरेनियमचा साठा रशियाकडे हस्तांतरित करेल किंवा तो पूर्णपणे सौम्य करेल. तोपर्यंत शस्त्रविराम कायम राहील.
* अमेरिकेकडून इराणच्या बंदरांवरील आर्थिक नाकेबंदी मागे घेतली जाईल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विक्रीसाठी सवलत मिळेल.
* इराणकडून बंद करण्यात आलेली आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी टप्प्याटप्प्याने पुन्हा खुली केली जाईल.
* इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध संपवणे हा या मसुद्याचा मुख्य भाग असला तरी इस्रायलने स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाईचे स्वातंत्र्य कायम ठेवले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी रविवारी त्यांनी सांगितले की, इराणसोबतच्या करारामुळे मध्य पूर्वेतील युद्ध अधिकृतपणे संपुष्टात येऊ शकते आणि याची घोषणा रविवारी उशिरापर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना रुबिओ म्हणाले, येत्या काही तासांत संपूर्ण जगाला एक अतिशय चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. हा प्रस्तावित करार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतच्या चिंता दूर करेल. या करारामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत जगाला असलेली भीती आणि चिंता कायमची संपुष्टात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.