India Oil Crisis: मध्य पूर्व आशियातील तणावाच्या वातावरणात भारतासाठी दिलासादायक बातमी येत आहे. हार्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवलेल्या इराणने या भागातून पाच देशांच्या जहाजांना जाण्यास परवानगी दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी याबाबतची इराणची रणनिती स्पष्ट केली. त्यांनी अत्यंत महत्वाची अशी हार्मुझ सामुद्रधुनी ही पूर्णपणे बंद केलेली नाही असा खुलासा केला. त्याचबरोबर त्यांनी भारतासह पाच देशांच्या जहाजांना या भागातून सुरक्षित रस्ता देण्याची घोषणा देखील केली.
अराघची यांनी सांगितल्याप्रमाणे, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधून सुरक्षित जाण्यास मार्ग दिला जाणार आहे. त्यांनी सांगितलं की या देशांनी इराणशी संपर्क करून हार्मुझमध्ये सुरक्षित मार्गाची मागणी केली होती. त्यानंतर समन्वय साधून त्यांना परवानगी देण्यात आली आहे. हार्मुझ फक्त शत्रू राष्ट्रांसाठीच बंद आहे मात्र इतर देशांसाठी खुला आहे असं सांगितलं. अराघची यांनी आम्ही युद्धाच्या स्थितीत आहोत. त्यामुळं शत्रू राष्ट्र आणि त्यांच्या सहयोगी देशांना हार्मुझ मधून जाऊ देण्याचा प्रश्नच नाही असं देखील ते म्हणाले.
अराघची पुढे म्हणाले, 'अनेक जहाज मालक किंवा त्यांच्या देशांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी हार्मुझमधून त्यांची जहाजे सुरक्षित जाऊ देण्याची मागणी केली होती. यातील अनेक देशांना आम्ही आमचे मित्र मानतो. किंवा काही वेगळ्या कारणाने आमच्या सेनेने त्यांना सुरक्षित मार्ग निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला आहे.'
'तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल की चीन, रशिया, पाकिस्तान, इराक, भारत आणि अजून काही देश माझ्या मते बांगलादेश या देशांनी आमच्याशी चर्चा केली. आमच्यासोबत समन्वय निर्माण केला आहे. हा समन्वय भविष्यात देखील सुरू राणार आहे. युद्धानंतरही हा समन्वय कायम राहील.'
अराघची यांनी अमेरिकेसोबत इराणची कोणतीही औपचारिक चर्चा होत नाहीये असा देखील खुलासा केला. ते म्हणाले की, मध्यस्थांच्या मार्फत संदेशाची देवाण घेवाण याला चर्चा म्हणत नाहीत. सरकारी चॅनलवर बोलताना अराघची यांनी स्पष्ट केलं की बॅक चॅनल संदेशांची देवाण घेवाण ही औपचारिक कुटनैतिक चर्चा नसते. अमेरिकेसोबत आमची कोणतीही चर्चा सुरू नाहीये असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
अराघची यांनी अमेरिका वेगवेगळ्या माध्यमातून संदेश पाठवत आहे. मात्र इराण याला औपचारिक चर्चा मानत नाही. या लष्करी संघर्षात अमेरिका त्यांचे उद्दिष्ट साध्य करू शकलेला नाही. अमेरिका त्वरित विजय मिळवू शकला नाही तसेच तो इराणमध्ये सत्तापरिवर्तन देखील करू शकला नाही.
इराणने आपल्या मजबूतीचं प्रदर्शन केलं आहे. त्यांनी दाखवलं की कोणताही देश त्यांच्या सुरक्षेला धोका पोहचवू शकला नाही. इराण युद्ध दीर्घकाळ खेचू इच्छित नाही मात्र युद्ध आम्ही आमच्या अटी शर्तींवरच थांबवू असं देखील अराघची यांनी सांगितलं.