मोहम्मद बागेर गालिबाफ 
आंतरराष्ट्रीय

Mohammad Ghalibaf | अमेरिकेला युद्धाची खुमखुमी; आम्ही बेचिराख करून टाकू

अमेरिकन तळ असलेल्या आखातीदेशांनाही इराणचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

तेहरान; वृत्तसंस्था : एकीकडे राजनैतिक वाटाघाटींचा संदेश देऊनही अमेरिका गुप्तपणे जमिनीवरील हल्ल्याचा कट रचत आहे. त्यांना युद्धाची खुमखुमी असेल तर आम्ही त्यांच्या सैन्याची वाट पाहत आहोत, त्यांना बेचिराख करून टाकू, असा इशारा इराण संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे.

अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक संदेश प्रसिद्ध केला आहे. ‘इराणी सैन्य जमिनीवर अमेरिकी सैन्याच्या आगमनाची वाट पाहत आहे, जेणेकरून त्यांना बेखिराख करूच. शिवाय त्यांच्या या प्रदेशातील भागीदारांना कायमची शिक्षा देता येईल,’ असे गालिबाफ यांनी म्हटले आहे. आमचा मारा सुरूच आहे. आमची क्षेपणास्त्रे सज्ज आहेत. आमचा निर्धार आणि विश्वास वाढला आहे.

गालिबाफ यांनी तस्निम वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या संदेशात लिहिले आहे की, शत्रू उघडपणे वाटाघाटींचा संदेश देत आहे आणि गुप्तपणे जमिनीवरील हल्ल्याची योजना आखत आहे. अमेरिका 15 मुद्द्यांच्या आधारे वाटाघाटी करू इच्छितो आणि युद्धात जे साध्य करू शकले नाही, त्याचा पाठपुरावा करत आहे, असे सांगून ते म्हणाले, आपण एका मोठ्या जागतिक युद्धात आहोत आणि शिखर परिषदेपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्यापुढील खडतर आणि कठोर मार्गाला सामोरे जाण्यासाठी आपण स्वतःला तयार ठेवले पाहिजे.

गालिबाफ हे पूर्वी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) चे कमांडर, पोलिस प्रमुख आणि तेहरानचे महापौर होते. अमेरिकेने त्यांना एक संभाव्य भागीदार म्हणून पाहिले असल्याचे वृत्त आहे आणि ते इराणच्या नेतेपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पसंती असल्याचेही म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT