अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिका आणि इराण यांच्यातील १४ कलमी करारामध्ये युद्धबंदी, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे, इराणला युद्धातील नुकसानीच्या संदर्भात आर्थिक दिलासा देण्यासाठी निधी उभारणे, इराणने कधीही अण्वस्त्र निर्माण करणार नसल्याची पुनरुच्चार केलेली हमी इत्यादींचा समावेश आहे. ‘सीएनएन’ने हा मसुदा मिळविला आहे.
इराण आणि अमेरिका तसेच सध्याच्या युद्धातील त्यांचे सहयोगी, या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होताच लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्धाचा तत्काळ आणि कायमस्वरूपी शेवट करीत आहेत. यापुढे एकमेकांविरुद्ध कोणतीही शत्रुत्वपूर्ण कारवाई करणार नाहीत आणि एकमेकांविरुद्ध शक्तीचा वापर किंवा त्याची धमकी देण्यापासून दूर राहतील, असे त्यात म्हटले आह.
या करारातील महत्त्वाचे मुद्दे..
* उभय देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे तसेच एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन.
* जास्तीत जास्त ६० दिवसांच्या कालावधीत, दोन्ही देश परस्पर संमतीने वाढवता येईल अशा मुदतीत, अंतिम करारावर वाटाघाटी करून तो पूर्ण करणार
* करारावर स्वाक्षरी होताच अमेरिका नौदल नाकेबंदी उठवेल. इराणबाबत कोणताही हस्तक्षेप किंवा अडथळा येऊ दिला जाणार नाही. जास्तीत जास्त ३० दिवसांच्या आत समुद्री वाहतूक पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू केली जाईल.
* करारावर स्वाक्षरी होताच पर्शियन आखातातून ओमानच्या समुद्राकडे आणि तेथून परत जाणाऱ्या व्यापारी जहाजांची वाहतूक ३० दिवसांच्या आत युद्धपूर्व पातळीवर पुन्हा सुरू होईल.
* अमेरिका आपल्या प्रादेशिक भागीदारांसह इराणच्या पुनर्बांधणी आणि आर्थिक विकासासाठी दोन्ही पक्षांनी मान्य केलेली व्यापक योजना तयार करण्याचे आश्वासन देत आहे . या योजनेसाठी किमान ३०० अब्ज डॉलर्सचा वित्तपुरवठा सुनिश्चित केला जाईल.
* अमेरिका अंतिम कराराचा भाग म्हणून ठरवल्या जाणाऱ्या वेळापत्रकानुसार इराणवरील सर्व प्रकारचे निर्बंध समाप्त करण्याचे वचन देत आहे.
* आपला देश कधीही अण्वस्त्रांची निर्मिती करणार नाही, हे इराण इथे पुन्हा स्पष्ट करीत आहे.
* अंतिम करार होईपर्यंत विद्यमान स्थिती कायम ठेवली जाईल, यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे.
* करारावर स्वाक्षरी होताच आणि निर्बंध उठवण्याच्या तारखेपर्यंत, अमेरिकेचा ट्रेझरी विभाग इराणी कच्चे तेल, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि त्यांची उपउत्पादने यांच्या निर्यातीसाठी सूट (वेव्हर्स) जारी करेल.
* सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आणि या करारातील कलम ४, ५, १० आणि ११ यांच्या अंमलबजावणीची सुरुवात झाल्याची खात्री मिळाल्यानंतर तसेच या उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी होत राहिल्यानंतर इराण आणि अमेरिका केवळ उर्वरित कलमांबाबत अंतिम करारासाठी वाटाघाटी सुरू करतील.
इराणचा गोठवलेला निधी परत देणार
इराणचा गोठवलेला किंवा निर्बंधित निधी व मालमत्ता मुक्त करून पूर्णपणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अमेरिका देत आहे. अंतिम कराराची यशस्वी अंमलबजावणी आणि भविष्यातील पालन सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा स्थापन केली जाईल.