वॉशिंग्टन / नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या तापलेल्या राजकीय वातावरणात भारताचे 'ऑपरेशन सिंदूर' अचानक केंद्रस्थानी आले आहे. फ्लोरिडा येथे आयोजित प्रचारसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताच्या या लष्करी कारवाईचा आणि त्यानंतरच्या घडामोडींचा उल्लेख करत आपल्या एका इशाऱ्यामुळे दोन अण्वस्त्रसज्ज देशांमधील युद्ध टळल्याचा दावा केला. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि भारताच्या कारवाईची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे.
फ्लोरिडा येथील जाहीर सभेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला ‘शांततादूत’ म्हणून सादर केले. मतदारांना संबोधित करताना ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये प्रचंड संघर्ष उसळला होता. दोन्ही देश कमालीचे संतापलेले होते. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितले, जर तुम्ही हे थांबवले नाही, तर अमेरिकेशी व्यापार विसरून जा. मी दोन्ही देशांवर २५० टक्के प्रचंड टॅरिफ लादेन. या व्यापारबंदीच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबले. या संघर्षात ११ विमाने पाडली गेल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले की, यासाठी मला संयुक्त राष्ट्रेला साधा फोनही करावा लागला नाही. मी ही युद्धे रोखली, हे माझ्यासाठी सन्मानाचे आहे.
भारताने दावा फेटाळला
दरम्यान, ट्रम्प यांनी निवडणुकीच्या भाषणात केलेल्या या दाव्यांवर भारताने पूर्वीप्रमाणेच ठाम भूमिका घेतली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारतीय लष्कराच्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तानच्या विनंतीवरूनच १० मे रोजी दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी परस्पर चर्चेतून गोळीबार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी किंवा अमेरिकेचा व्यापारविषयक दबाव नव्हता, हे भारताने आधीच अधोरेखित केले आहे.
नोबेल पुरस्काराची खंत व्यक्त
अमेरिकन मतदारांसमोर आपली राजकीय क्षमता अधोरेखित करताना ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. मी जवळपास आठ युद्धे मिटवली आहेत, तरीही मला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला का? मुळीच नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या कथित आंतरराष्ट्रीय यशाचे भांडवल प्रचारमंचावरून केले.