बैरूत/वायनाड : लेबनॉनमधील पेजर स्फोटात मूळ भारतीय रिन्सन जोस (वय 37) याचे नाव आता समोर येत आहे. केरळमधील वायनाड येथील मूळचा जोस हा बल्गेरियन कंपनी नॉर्टा ग्लोबल लिमिटेडचा मालक आहे. हंगेरीनंतर आता या कंपनीच्या माध्यमातून हिजबुल्लाहला पेजर पुरवले गेल्याचे सांगण्यात येते. रिन्सनचे वडील वायनाडमध्येच राहतात. रिन्सन दररोज फोन करायचा; पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा फोन आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
हे तीन मुद्दे महत्त्वाचे
१. पेजर हल्ल्यानंतर रिन्सन बेपत्ता आहे.
२. रिन्सन सध्या अमेरिकेत असल्याचे सांगण्यात येते.
३. त्याची कंपनी इस्रायलची बनावट कंपनी असणे शक्य आहे.
हंगेरीतील एका कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टियानो बार्सोनी याचेही नाव संशयितांच्या यादीत आहे. तैवान, हंगेरी आणि बल्गेरियातील कंपन्यांची नावे या प्रकरणात समोर येत आहेत. लेबनॉनमधील पेजर बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर तीन हजारांपर्यंत लोक जखमी झाले होते.
नॉर्टा ग्लोबल लिमिटेड कंपनीची स्थापना बल्गेरियात एप्रिल 2022 मध्ये झाली. नॉर्टा ग्लोबलची मालकी नॉर्वेचा नागरिक रिन्सन जोसकडे आहे. बल्गेरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून रिन्सनला क्लीन चिट देण्यात आली आहे. नॉर्टा ग्लोबलकडून कोणतीही खेप देशातून गेलेली नाही. त्यामुळे पेजर स्फोटात या कंपनीची काही भूमिका असणे शक्य नाही, असे यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.