Wall Street shut down for Indian wedding desi barat
न्यूयॉर्क : जगाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या न्यूयॉर्कमधील ‘वॉल स्ट्रीट’वर चक्क 400 जणांची भारतीय वरात धडकली आणि त्या रस्त्यावर क्षणभरासाठीच का होईना, पण पारंपरिक भारतीय विवाह सोहळ्याचं रंगतदार दृश्य पाहायला मिळालं.
या शानदार वरातीनं न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतींच्या पार्श्वभूमीवर एक अविस्मरणीय अनुभव निर्माण केला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
या वरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यात पारंपरिक पेहरावात सजलेले वऱ्हाडी डीजे बीट्सवर थिरकताना पाहायला मिळतात. वर आणि वधूचा पोशाखही लक्ष वेधून घेतो. वधूने परिधान केलेला लाल लेहेंगा आणि वराचा बेझ रंगाचा शेरवानी – या दोघांची उपस्थिती या जल्लोषात मध्यवर्ती ठरली.
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य अत्यंत आकर्षक आणि रंगीबेरंगी दिसत आहे. व्हिडिओमध्ये वधू-वराच्या आनंदात सहभागी झालेल्या कुटुंबीय आणि मित्र मंडळींचा उत्साह देखील स्पष्टपणे दिसून येतो.
DJ AJ नावाच्या डीजेने या इव्हेंटमध्ये परफॉर्म केलं आणि त्यानेच याबाबतची पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे. त्यने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 400 लोकांची वरात घेऊन आम्ही वॉल स्ट्रीटच बंद केली. कुणाला याची कल्पनाही करता आली नसती. आयुष्यात एकदाच अनुभवता येणारा असा हा जादुई क्षण आहे.
या उत्साही वरातीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली. एकाने लिहिलं आहे की, “तसं तर डीजे प्रत्येक पार्टीमध्ये ग्लास सीलिंग फोडतो, आता तर त्याने वॉल स्ट्रीटलाच डान्स फ्लोअर बनवले आहे!”
दुसऱ्याने लिहिलं आहे, “इतकं वाईल्ड! 450+ पाहुणे... न संपणारी वरात... आणि तू! योजना आखताना मजा आली.”
तिसऱ्या युजरने तर ‘Empire State of Mind’ या गाण्याच्या ढोल वर्जनवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, “कधी वाटलं नव्हतं की हे गाणं ढोलच्या ठोक्यावर ऐकायला मिळेल, भन्नाट!”
या धमाल वरातीचा व्हिडिओ केवळ भारतीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनीही आवडीने पाहिला आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीचा आणि न्यूयॉर्कसारख्या आधुनिक शहराचा संगम अशा पद्धतीने पाहायला मिळणं दुर्मिळच!
या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी या उत्सवी घटनेची प्रशंसा केली आहे. काहींनी या व्हिडिओला 'वॉल स्ट्रीटवर भारतीय विवाहाची धूम' असे संबोधले आहे. या व्हिडिओने भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे आणि समृद्धतेचे दर्शन घडवले आहे.
या घटनेने भारतीय विवाह संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रसार केला असून, न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहरात भारतीय परंपरांचा स्वीकार आणि सन्मान याचे प्रतीक ठरले आहे.
लग्नाची वरात हा अस्सल भारतीय अनुभव आहे. त्यामुळे अमेरिकेत असे प्रकार क्वचितच पाहायला मिळतात.
ब्रॉडवे - यापुर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर एक मोठी भारतीय वरात निघाली होती. ज्यामुळे रस्ता तात्पुरता बंद झाला. या वरातीत 400 हून अधिक लोक सहभागी झाले होते, ज्यात पारंपरिक भारतीय पोशाखात सजलेले वऱ्हाडी डीजेच्या ठेक्यावर सर्व नाचत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
फ्लोरिडा - मार्च 2015 मध्ये, फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचमध्ये 100 हून अधिक पाहुण्यांचा सहभाग असलेली एक भारतीय वरात रस्त्यावरून निघाली. पारंपरिक भारतीय संगीत आणि नृत्याचा यात समावेश होता. या उत्सवासाठी विशेष परवानगी घेतली होती.
फिलाडेल्फिया - फिलाडेल्फियाच्या इंडिपेंडन्स मॉलवर एका भारतीय विवाह सोहळ्यात पारंपरिक भारतीय पोशाखात सजलेले लोक रस्त्यावर नाचत होते, तेही चर्चेचे ठरले होते.