पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranjani Srinivasan Self Deport: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अमेरिका फर्स्ट चा नारा देत विविध निर्णय घेण्यास सुरवात केली. आणि तेव्हापासून या ना त्या कारणाने अमेरिका सतत चर्चेत आली आहे. कधी टॅरिफ वॉर, कधी निर्वासितांची पाठवणी, कधी युद्धग्रस्त राष्ट्रांच्या नेत्यांवर दादागिरी... अशी ही कारणे आहेत. आताही अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थिनीने स्वतःहून तिथून भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याने हा विषय चर्चेत आला आहे.
कोलंबिया विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या या विद्यार्थिनीचे नाव आहे रंजनी श्रीनिवासन. ५ मार्च २०२५ रोजी अमेरिकेच्या मंत्रालयाने रंजनीचा व्हिसा रद्द केला. त्यामुळे तिने स्वतःहून तिथून परत येण्याचा निर्णय घेतला. व्हिसा रद्द करण्याचे कारण म्हणजे, रंजनीने मध्यपुर्वेतील इस्त्रायल-हमास युद्धात हमासची पाठराखण केल्याचा तिच्यावर आरोप आहे. अमेरिकेत हमास ही एक दहशतवादी संघटना मानली जाते. पॅलेस्टाईनवरून सुरू असलेल्या युद्धात हमास पॅलेस्टाईनच्या बाजूने आहे. त्यामुळे अमेरिकेतील मंत्रालयाने तिचा व्हिसा रद्द केला. अमेरिकेत अलीकडच्या काही महिन्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनाथ विविध ठिकाणी, विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये परदेशी विद्यार्थ्यांनी व्यापक आणि मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. अमेरिकेचा निषेधही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रंजनी हिनेदेखील हमासला पाठिंबा दिला होता.
त्यानंतर रंजनी श्रीनिवासन हीने CBP Home App चा वापर करून ११ मार्च रोजी सेल्फ डीपोर्टसाठी पावले उचलली. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाच्या मंत्री क्रिस्टी नोएम यांनीदेखील रंजनीच्या या सेल्फ डीपोर्टेशनला दुजोरा दिला आहे. त्यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांचा व्हिसा रद्द करण्यास अमेरिका कटिबद्ध आहे. जर तुम्ही हिंसाचार आणि दहशतवादाची वकिली करत असाल तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या विशेषाधिकार आम्ही रद्द करू, असे त्यात म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने अशा प्रकारांविरोधात ठाम आणि कडक भूमिका घेतल्याचे त्यातून स्पष्ट होते.
रंजनी ही मूळची भारतीय असून तिला फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली आहे. त्या शिष्यवृत्तीवर ती कोलंबिया विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग या विषयावर पीएच.डी. करत आहे. यापुर्वी तिने याच विद्यापीठातून अर्बन प्लॅनिंग विषयात एम.फिल ही पदवी घेतली आहे. तर हावर्ड विद्यापीठातून तीने मास्टर इन डिझाईन ही पदवी घेतली आहे. भारतातील CEPT विद्यापीठातून तीने बॅचलर इन डिझाईन पदवी संपादन केली आहे. विकासाचे राजकीय अर्थकारण, जमिन आणि श्रमिक यांचा सहसंबध असा तिचा अभ्यासाचा विषय आहे. पॅलेस्टाईन समर्थनाथ झालेल्या निदर्शनात तिचा सहभागाने तिच्याविषयी तसेच तिच्या राजकीय कनेक्शनविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मंत्रालयाने तिच्याबाबत नेमकी काय कारवाई केली, याचे तपशील उघड झालेले नाहीत. मंत्री नोएम यांनी शेअर केलेला एक व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ज्यात रंजनी श्रीनिवासन घाईघाईने एअरपोर्टवर जाताना दिसून येते. तिच्या हातात सुटकेस आहे.
अमेरिकेतून स्वेच्छेने निर्वासित होणाऱ्यांना मदत करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हे ॲप लाँच केले आहे. या अॅपद्वारे अवैध स्थलांतर करणारे किंवा व्हिसा रद्द केलेल्या व्यक्ती देश सोडण्याचा निर्णय जाहीर करू शकतात. सीमा तपासणी वेळा, तात्पुरत्या कागदपत्रांची पुतर्तादेखील हे ॲप करते. रंजनीने याच ॲपचा वापर केला आहे.