India Netherlands relations | हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक; नेदरलँडस्मधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन  -
आंतरराष्ट्रीय

India Netherlands relations | हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक; नेदरलँडस्मधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

हेग (नेदरलँडस्); वृत्तसंस्था : आधी कोव्हिडचे संकट आले, त्यानंतर युद्ध सुरू झाले आणि आता जागतिक ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक बनत चालले आहे. परिस्थिती लवकर बदलली नाही, तर गेल्या काही दशकांतील प्रगती नष्ट होईल आणि जगातील एक मोठी लोकसंख्या पुन्हा एकदा गरिबीच्या गर्तेत ढकलली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आपल्या पाच देशांच्या अधिकृत दौर्‍याचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी सध्या नेदरलँडस्मध्ये आहेत.

राजधानी हेग येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात तेथील अनिवासी भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते. येथील वातावरण पाहून द हेग हे भारत-नेदरलँडस् मैत्रीचे जिवंत प्रतीक बनल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘पासपोर्टचा रंग बदलू शकतो, राहण्याचा पत्ता बदलू शकतो आणि टाईम झोनही बदलू शकतो; परंतु भारतमातेच्या लेकरांमधील आपुलकी, उत्साह आणि आयुष्याचा आनंद साजरा करण्याची जिद्द कधीही बदलू शकत नाही, असे भावनिक उद्गार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काढले.

भारताची डिजिटल झेप

पंतप्रधानांनी गेल्या 12 वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा पाढा वाचला. डिजिटल क्रांतीचा उल्लेख करताना ते म्हणाले, ‘आज भारतात दरमहा 20 अब्जांपेक्षा जास्त यूपीआय व्यवहार होत आहेत. 12 वर्षांपूर्वी देशात 500 पेक्षा कमी स्टार्टअप्स होते, आता त्यांची संख्या 2 लाखांच्या पार गेली आहे.’

‘जय भवानी, जय शिवाजी’

नेदरलँडस्च्या एनआरआय यांनी जपलेल्या आपल्या परंपरांचा मोदींनी उल्लेख केला. ‘मी येथे आलो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिसला. या वाक्यावर उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ गजर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT