आंतरराष्ट्रीय

इटलीत भारतीय शेतमजुराचा मृत्यू

Arun Patil

रोम, वृत्तसंस्था : इटलीतील लॅटिना भागात शेतात काम करणार्‍या सतनाम सिंग या 30 वर्षीय भारतीय शेतमजुराचा बुधवारी मृत्यू झाला. शेतात गवत कापत असताना मशिनने सतनामचा हात कापला गेला. त्यानंतर त्याच्या मालकाने त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला घराजवळील रस्त्याच्या कडेला एकटे सोडून दिले. या घटनेची माहिती पोलिसांना सतनामची पत्नी आणि त्याच्या मित्रांनी दिली. त्यानंतर सतनामला उपचारासाठी राजधानी रोममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर सतनामला कचर्‍याप्रमाणे फेकून दिल्याचे इटलीच्या कामगार संघटनेने म्हटले आहे. इटलीचे कामगार मंत्री मरिना काल्डेरोन यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. हा प्रकार म्हणजे एक क्रौर्यच आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून, दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाणार असल्याचे काल्डेरोन यांनी सांगितले. या घटनेबाबत इटलीतील भारतीय दूतावासाने दुःख व्यक्त केले आहे. आम्ही सतनामच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. सतनाम हा लॅटिना या ग्रामीण भागात काम करायचा.

SCROLL FOR NEXT